नवी दिल्ली: कार्ड पेमेंट क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी असलेली मास्टरकार्ड लवकरच परदेशातील सर्व्हरवरील भारतीय ग्राहकांचा संपूर्ण डेटा डिलीट करणार आहे. मास्टरकार्डनं याबद्दलची माहिती दिली आहे. यामुळे कार्डधारकांच्या माहितीला धोका पोहोचू शकतो, असा इशारादेखील कंपनीकडून देण्यात आला आहे. भारतातील कार्डधारकांची माहिती देशातच साठवली जावी, अशा सूचना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं मास्टरकार्डला दिल्या आहेत. परदेशातील सर्व्हरवर साठवण्यात आलेली भारतीयांची माहिती डिलीट करण्याची प्रक्रिया वाटते तितकी सोपी नाही, अशी माहिती मास्टरकार्डचे भारत आणि दक्षिण आशियाचे प्रभारी पौरुष सिंह यांनी दिली. परदेशातील माहिती डिलीट करताना अडचणी येऊ शकतात, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. यामुळे अनेक व्यवहार करताना अडथळे निर्माण होऊ शकतात, असंही त्यांनी सांगितलं. एक बटण दाबलं की माहिती डिलीट होते, अशी ही प्रक्रिया नाही. त्यामध्ये माहिती संकटात सापडण्याचा धोका असतो, असं सिंह म्हणाले. 'परदेशी सर्व्हरवरुन डेटा डिलीट करण्याची प्रक्रिया अतिशय क्लिक्ट आहे. यामध्ये माहिती संकटात सापडण्याचा धोका असतो. ग्राहकांची माहिती गहाळ झाल्यास त्यांच्याकडून दंड ठोठावला जाऊ शकतो,' असं सिंह यांनी सांगितलं. मास्टरकार्ड कंपनी 200 हून अधिक देशांमध्ये सक्रीय आहे. मात्र भारत सोडून कोणत्याही देशानं आम्हाला अशा प्रकारची सूचना दिलेली नाही, असा नाराजीचा सूर त्यांनी लावला. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं एप्रिलमध्ये नवे नियम जारी केले. यानुसार भारतीय कार्डधारकांच्या आर्थिक व्यवहारांची संपूर्ण माहिती केवळ भारतात साठवण्याची सूचना मास्टरकार्डला देण्यात आली. त्यामुळे जगभरातील सर्व्हरवरुन मास्टरकार्डला भारतीयांची माहिती डिलीट करावी लागेल. याचा मोठा फटका मास्टरकार्डला बसणार आहे.
मास्टरकार्ड वापरताय? लवकरच येणार मोठं संकट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2018 12:05 PM