Join us

MDH, Everest मसाल्यांची तपासणी होणार; हाँगकाँग, सिंगापूरमध्ये बंदीनंतर केंद्र सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2024 8:49 AM

MDH, Everest Spices : हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये एमडीएच आणि एव्हरेस्टच्या चार मसाल्यांवर बंदी घातल्यानंतर आता भारत सरकारही अ‍ॅक्शन मोडमध्ये आलंय. यावर आता कंपनीनंही प्रतिक्रिया दिली आहे.

MDH, Everest Spices : हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये एमडीएच आणि एव्हरेस्टच्या चार मसाल्यांवर बंदी घातल्यानंतर आता भारत सरकारनं फूड कमिश्नर्सना सर्व कंपन्यांच्या मसाल्यांचे नमुने गोळा करण्यास सांगितलं आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये यासंदर्भातील माहिती देण्यात आलीये. या दोन्ही कंपन्यांच्या उत्पादनांमध्ये पेस्टिसाइड एथिलीन ऑक्साइडचं प्रमाण जास्त असल्याने त्यावर बंदी घालण्यात आली.

या उत्पादनांमध्ये या पेस्टिसाइडचं प्रमाण जास्त असल्यानं कर्करोगाचा धोका असतो. एमडीएच ग्रुपच्या मद्रास करी पावडर, सांबार मसाला पावडर आणि करी पावडर या तीन मसाल्यांच्या मिश्रणात इथिलीन ऑक्साईडचं प्रमाण जास्त असल्याचं हाँगकाँगच्या अन्न सुरक्षा विभागानं म्हटलंय. एव्हरेस्टच्या फिश करी मसाल्यातही हे कार्सिनोजेनिक पेस्टिसाइड आढळल्याचं म्हटलं जातंय. 

२० दिवसांमध्ये लॅब रिपोर्ट 

देशातील सर्व फूड कमिश्नर्सना या प्रकरणी अलर्ट करण्यात आलंय. मसाल्यांच्या सँपल कलेक्शनची प्रक्रिया सुरू करण्यात आलीये. तीन ते चार दिवसांमध्ये एमडीएच आणि एवरेस्टसह देशातील सर्व कंपन्यांच्या मॅन्युफॅक्चरिंग युनिट्समधून सँपल घेतले जातील. याचा लॅब रिपोर्ट २० दिवसांमध्ये येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

... तर कठोर कारवाई होणार 

भारतात फूड आयटम्समध्ये एथिलीन ऑक्साइडच्या वापरावर बंदी आहे. भारतीय मसाल्यांमध्ये अशा प्रकारचे घटक आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल. यासाठी  फौजदारी कारवाईचीही तरतूद आहे. सरकारनं मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री अंतर्गत स्पाइस बोर्डला उत्पादनांमध्ये कोणतेही हानिकारक घटक जोडू नयेत यासाठी जनजागृती करण्याचं आवाहन केलंय. 

प्रकरणाची चर्चा का ? 

हाँगकाँगच्या सेंटर फॉर फूड सेफ्टीनं (CFS) ग्राहकांना ही उत्पादनं खरेदी करू नयेत आणि व्यापाऱ्यांनी त्यांची विक्री करू नये असं सांगितलं आहे. तर सिंगापूर फूड एजन्सीने असे मसाले मागे घेण्याचे निर्देश दिले आहेत. या उत्पादनांमध्ये MDH च्या मद्रास करी पावडर (मद्रास करीसाठी मसाल्यांचे मिश्रण), एव्हरेस्ट फिश करी मसाला, एमडीएच सांबार मसाला मिश्रित मसाला पावडर आणि एमचडीएच करी पावडर मिश्रित मसाला पावडर यांचा समावेश आहे. 

एव्हरेस्टनं काय म्हटलंय? 

"एव्हरेस्टवर कोणत्याही देशात बंदी नाही. सिंगापुरच्या फूड सेफ्टी अथॉरिटीनं हाँगकाँगच्या रिकॉल अलर्टचा हवाला दिला आहे. आम्ही सिंगापुरच्या आयातदाराला पुढील तपासासाठी प्रलंबित उत्पादन परत मागवून घेण्यास आणि तात्पुरत्या स्वरुपात होल्ड करण्यास सांगितलं आहे," असं कंपनीच्या प्रवक्त्यानं सांगितलं. कंपनीचे सर्व प्रोडक्ट सुरक्षित आणि उच्च गुणवत्तेचे आहेत, असं आश्वासनही कंपनीनं दिलंय.

टॅग्स :व्यवसायसिंगापूरभारतअन्न