मुंबई - टाटा उद्योग समुहातील शापूरजी पालोनजी मिस्त्री यांच्याकडे अब्जावधी रुपयांची संपत्ती आहे. मात्र, त्यापैकी एक रुपयाही रक्कम त्यांना खर्च करता येत नाही. अब्जाधीश पालोनजी यांची एकूण संपत्ती 20 अब्ज डॉलर म्हणजे 1,30,940 कोटी रुपये आहे. या संपत्तीचा 84 टक्के वाटा टाटा सन्सच्या कायदेशीर वादात अडकला आहे. त्यामुळे अब्जाधीश असूनही मिस्त्री यांना एक रुपयाही या संपत्तीतून खर्च करता येणार नाही.
टाटा सन्सच्या संचालक मंडळातील वादानंतर 2016 मध्ये शापूरजी मिस्त्री यांचा मुलगा सायरस मिस्त्री यांना टाटा सन्सच्या चेअरमनपदावरुन हटविण्यात आले. त्यानंतर टाटा ग्रुप आणि मिस्त्री कुटुबीयांत कायदेशीर लढाई सुरु आहे. मिस्त्री हे टाटा सन्सचे सर्वात मोठे शेअर होल्डर आहेत. 100 अब्ज डॉलरची संपत्ती असलेल्या टाटा ग्रुपविरुद्ध सायरस मिस्त्री यांनी कायदेशीर लढाईला सुरुवात केली. त्यामध्ये गवर्नन्स लॅप्ससह कंपनीच्या बोर्डमधील फेरबदलावरुन अनेक आरोप करण्यात आले. न्यायालयात सुरू असलेल्या या वादात टाटा सन्सकडून एक मागणी करण्यात आली आहे. त्यानुसार, हा खटला निकाली निघेपर्यंत टाटा सन्सच्या कुठल्याही शेअर होल्डर्सला आपल्या संपत्तीतील एक रुपयाही विकता येणार नाही. या महिन्यातच त्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे शापूरजी पालोनजी मिस्त्री यांची अब्जवधींची संपत्ती कायदेशीर वादात अडकली आहे. दरम्यान, ब्लूमबर्गच्या अहवालानुसार टाटा सन्समध्ये मिस्त्री यांची 16.7 अब्ज डॉलर एवढी संपत्ती आहे. मात्र, टाटा सन्स बोर्डाच्या मंजुरीशिवाय या संपत्तीला विकता येणार नाही.