Join us

मेहुल चोक्सीला १० वर्षे शेअर बाजारात बंदी, पाच कोटींचा दंड, म्युच्युअल फंडाची जप्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2023 6:28 AM

बँक खाती, शेअर्स व म्युच्युअल फंड खाती जप्त करत त्यातून कर्जाच्या पैशांची वसुली करण्याचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: पंजाब नॅशनल बँकेला १४ हजार कोटी रुपयांचा गंडा घालत परदेशात दडून बसलेल्या मेहूल चोक्सी याने गीतांजली जेम्स लि. कंपनीच्या समभागांच्या व्यवहारात गैरव्यवहार केल्याप्रकरणी सेबीने ५ कोटी ३५ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. या दंडाच्या वसुलीकरिता त्याची बँक खाती, शेअर्स, म्युच्युअल फंड खाती यांची जप्ती करत हे पैसे वसूल करण्याचे आदेश सेबीने दिले आहेत. तसेच, भारतीय भांडवली बाजारात मेहूल चोक्सी याच्यावर १० वर्षांची बंदी घालण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

गीतांजली समुहाचा संस्थापक असलेल्या मेहूल चोक्सी याने गीतांजली जेम्स. लि. या समुहातील कंपनीच्या समभागाच्या किमती वाढविण्यासाठी जुलै २०११ ते जानेवारी २०१२ या कालावधीमध्ये १५ बनावट खात्यांद्वारे व्यवहार केले होते. याप्रकरणी  सेबीकडे तक्रार दाखल झाली. त्यावेळी हे संशयास्पद व्यवहार केल्याचे त्यांना दिसून आले. त्यानंतर २०२१ व २०२२ मध्ये सेबीने त्याच्यावर दंडाची कारवाई केली. मात्र, हे पैसे न भरल्यामुळे पुन्हा त्याला नोटीस जारी करण्यात आली होती. याप्रकरणी दंडाची ५ कोटी रुपये इतकी असून, त्याच्यावरचे व्याज ३५ लाख रुपये आहे. दरम्यान, २०१८ मध्ये पंजाब नॅशनल बँकेला १४ हजार कोटी रुपयांचा गंडा घातल्यानंतर मेहूल चोक्सी भारताबाहेर पळून गेला. त्यामुळे दंड वसुली झालेली नाही. त्यानंतर आता सेबीने या प्रकरणाची सुनावणी घेत त्याची बँक खाती, शेअर्स व म्युच्युअल फंड खाती जप्त करत त्यातून या पैशांची वसुली करण्याचे आदेश संबंधित बँकांना दिले असून, त्याच्या बँकेतील लॉकर्सचीही जप्ती करण्यात येणार आहे. सीएसडीएल, एनएसडीएल यांनी देखील त्याच्या कोणत्याही व्यवहारातून त्याला पैसे न काढू देण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

टॅग्स :पंजाब नॅशनल बँक घोटाळा