Join us

मर्सिडिज, पुण्यात ४ कोटींचा प्लॉट, म्युच्युअल फंडातही मोठी गुंतवणूक; किती आहे अरुण गोविल यांची संपत्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2024 2:20 PM

मेरठ मतदारसंघातून भाजपचे उमेदवार अरुण गोविल यांनी लोकसभा निवडणूक २०२४ साठी अर्ज दाखल केला. टीव्ही सीरियल 'रामायण'मध्ये प्रभू श्रीरामांची भूमिका साकारणाऱ्या अरुण गोविल यांनी यावेळी आपल्या संपत्तीचा खुलासा केला.

मेरठ मतदारसंघातून भाजपचे उमेदवार अरुण गोविल यांनी मंगळवारी म्हणजेच २ एप्रिल रोजी लोकसभा निवडणूक २०२४ साठी अर्ज दाखल केला. टीव्ही सीरियल 'रामायण'मध्ये प्रभू श्रीरामांची भूमिका साकारणाऱ्या अरुण गोविल यांनी यावेळी आपल्या संपत्तीचा (Arun Govil Net Worth) खुलासा केला. अरुण गोविल हे कोट्यवधींच्या संपत्तीचे मालक आहेत. त्यांनी शेअर बाजार, म्युच्युअल फंड आणि रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक केली आहे, ज्यांचं मूल्य आज कोट्यवधी रुपयांमध्ये आहे. 

अरुण गोविल यांच्या लाईफस्टाईलबद्दल बोलायचं झालं तर ते लक्झरी लाईफ जगातात. अरुण गोविल यांच्याकडे ६२.९९ लाख रुपयांची मर्सिडीज कार आहे, जी त्यांनी जून २०२२ मध्ये खरेदी केली होती. त्यांच्याकडे एकूण ३.१९ कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आहे, तर त्यांची पत्नी श्रीलेखा गोविल यांच्याकडे २.७६ कोटी रुपयांची (Arun Govil Net Worth) एकूण जंगम मालमत्ता आहे. त्यांनी पुण्यात ४५ लाख रुपयांना प्लॉट खरेदी केला होता आणि आज त्याची किंमत ४.२५ कोटींच्या पुढे गेली आहे. 

इतक्या स्थावर मालमत्तेचे मालक 

जर अरुण गोविल यांच्या स्थावर मालमत्तेबद्दल बोलायचं झालं तर त्यांच्या एकूण स्थावर मालमत्तेचं मूल्य ५.६७ कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे, तर श्रीलेखा यांच्या स्थावर मालमत्तेचं एकूण मूल्य २.८० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. अरुण गोविल यांच्यावर १४.६४ लाखांपेक्षा अधिक कर्ज आहे. मूळ मेरठचे रहिवासी असलेले ७२ वर्षीय अरुण गोविल हे मुंबईतील अंधेरी पश्चिम भागात राहतात. 

शेअर्समध्ये इतकी गुंतवणूक 

अरुण गोविल यांच्याकडे ३.७५ लाख रुपये रोख आहेत, तर त्यांच्या पत्नीकडे ४.०७ लाख रुपये रोख आहेत. अरुण गोविल यांच्या बँक खात्यात १.०३ कोटींहून अधिक रुपये आहेत, तर श्रीलेखा यांच्या बँक खात्यात ८०.४३ लाखांपेक्षा जास्त जमा आहेत. त्यांनी शेअर्समध्ये १.२२ कोटी रुपयांहून अधिक आणि म्युच्युअल फंडांमध्ये १.४३ कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली आहे. 

किती आहे सोनं? 

गोविल यांच्याकडे २२० ग्रॅम वजनाचे दागिने आहेत ज्याची किंमत १०.९३ लाख रुपये आहे, तर श्रीलेखा यांच्याकडे ६०० ग्रॅम वजनाचे दागिने आहेत ज्याची किंमत ३२.८९ लाख रुपये आहे. गोविल यांच्याकडे पुण्यात एक प्लॉट आहे, तर त्यांच्या पत्नीकडे मुंबईतील अंधेरी पश्चिम भागात फ्लॅट आहे, ज्याची किंमत सध्या २ कोटींहून अधिक आहे.

टॅग्स :लोकसभाटेलिव्हिजन