ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 6 - जर्मनीतील कार निर्मिती कंपनी मर्सिडीजने जगभरातील 10 लाख कार परत मागवल्या आहेत. कारमध्ये आग लागण्याच्या तसंच ओव्हरहिट होत असल्याच्या तक्रारी येत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. अमेरिकेतील एकूण 75 हजार कारमालकांकडून कार ओव्हरहिट होत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या.
मर्सिडीजने ज्या कार परत बोलावल्या आहेत त्यामध्ये सी क्लास, ई क्लास आणि सीएलए कारव्यतिरिक्त जीएलए आणि जीएलसी एसयूव्हीचा समावेश आहे. या सर्व कारची निर्मिती 2015 ते 2017 दरम्यान झाली आहे. फक्त अमेरिकेतील एकूण 3 लाख 8 हजार कारना परत मागवण्यात आलं आहे.
जगभरातून कारला आग लागल्याच्या एकूण 51 घटना समोर आल्या आहेत. यामधील 30 घटना तर एकट्या अमेरिकेतल्या आहेत. सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झालं नसल्याचं कंपनीने सांगितलं आहे.
मर्सिडीडने रविवारी अमेरिका सरकारकडे सोपवलेल्या कागदपत्रांमध्ये सांगितलं आहे की, वारंवार कार स्टार्ट केल्याने ओव्हरहिटींग होत असून यामुळे कारचे काही भाग निघण्याची शक्यता असते. या सर्व कार रिपेअर करण्यात येणार असून त्यासाठी कोणताही शुल्क आकारण्यात येणार नाही.