मुंबई : देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक आॅफ इंडियामध्ये, बँकेच्या पाच सहयोगी बँकांच्या विलीनीकरणाची प्रक्रिया दृष्टीपथात येताना दिसत आहे. विलीनीकरणाची चर्चा असलेल्या पाचही बँकांच्या संचालक मंडळाने या विलीनीकरणाच्या प्रक्रियेला तत्वत: मान्यता दिली आहे. मात्र आॅल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिशएनने या विलीनीकरणास तीव्र विरोध दर्शवितानाच या पाचही बँकांतील कर्मचाऱ्यांसाठी येत्या २० मे (शुक्रवारी) संपाची हाक दिली आहे.
स्टेट बँकेच्या एकूण सात सहयोगी बँका होत्या. यापैकी स्टेट बँक आॅफ सौराष्ट्र आणि स्टेट बँक आॅफ इंदोर या दोन्ही बँकांचे विलीनकरण यापूर्वीच झाले. तर आता विलीनीकरणाच्या प्रक्रियेत असलेल्या बँकांमध्ये स्टेट बँक आॅफ हैदराबाद, स्टेट बँक आॅफ म्हैसूर, स्टेट बँक आॅफ जयपूर अँड बिकानेर, स्टेट बँक आॅफ पटिलाला आणि स्टेट बँक आॅफ त्रावणकोर या बँकांचा समावेश आहे. स्टेट बँकेच्या उच्चाधिकाऱ्यांसोबत या सहयोगी बँकांच्या उच्चाधिकाऱ्यांची मंगळवारी बैठक पार पडली.
या बैठकीत या विलीनीकरणाच्या प्रक्रियेवर विस्तृत चर्चा होतानाच तत्वत: मान्यताही झाली. लवकरच या संदर्भातील विस्तृत प्रस्ताव आणि अहवाल केंद्र सरकारला पाठविण्यात येईल आणि त्यानंतर या विलीनीकरणाची प्रक्रिया अंतिम होईल. (प्रतिनिधी)
>एकाधिकारशाहीचा वापर करत निर्णय माथी मारला
कर्मचारी संघटनांनी या विलीनीकरणाचा तीव्र विरोध केला. एसबीआयने एकाधिकारशाहीचा वापर करत हा निर्णय थोपला असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. या विलीनीकरणाची चर्चा अनेक वर्षांपासून असून संबंधित कर्मचाऱ्यांशी निगडीत अनेक मुद्दे आहेत, त्याचे निराकरण झालेले नाही. स्टेट बँकेच्या या निर्णयाविरोधात येत्या २० मे रोजी या पाचही बँकांचे कर्मचारी संपावर जातील व आपला विरोध प्रदर्शित करतील, असा इशारा आॅल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनचे उपाध्यक्ष विश्वास उटगी यांनी दिली.
स्टेट बँकेच्या पाच बँकांचे विलीनीकरण दृष्टिपथात
स्टेट बँक आॅफ इंडियामध्ये, बँकेच्या पाच सहयोगी बँकांच्या विलीनीकरणाची प्रक्रिया दृष्टीपथात येताना दिसत आहे.
By admin | Published: May 18, 2016 05:45 AM2016-05-18T05:45:36+5:302016-05-18T05:45:36+5:30