meta ceo mark zuckerberg : 'थांबायचं नाय गड्या थांबायचं नाय..' अशी परिस्थिती सध्या सोशल मीडिया कंपनी मेटाचे (पूर्वीची फेसबुक) सह-संस्थापक आणि सीईओ मार्क झुकरबर्ग यांची झाली आहे. याला कारण ठरलंय झुकरबर्गने यांची झपाट्याने वाढणार संपत्ती. दोन दिवसांपूर्वीच त्यांची २०० अब्ज डॉलर्स नेटवर्थ क्लबमध्ये एन्ट्री झाली होती. त्यावेळी जगातील ते तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. मात्र, मार्क यांनी आता थांबायचं नाही हे जास्तच मनावर घेतलंल दिसतंय. कारण, दोनच दिवसात ते जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. झुकरबर्ग यांनी जेफ बेझोस यांना मागे टाकले आहे. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, ३ ऑक्टोबर २०२४ रोजी झुकरबर्ग यांची एकूण संपत्ती २०६.२ अब्ज डॉलर झाली आहे.
झुकेरबर्गच्या संपत्तीत ७८ अब्ज डॉलरची वाढ
मार्क झुकरबर्ग यांची मेटामध्ये १३% भागीदारी आहे. वर्षाच्या सुरुवातीपासून त्यांची एकूण संपत्ती ७८ अब्ज डॉलरने वाढली आहे. ब्लूमबर्ग इंडेक्सद्वारे ट्रॅक केलेल्या ५०० श्रीमंत लोकांमध्ये मार्क यांची संपत्ती सर्वात वेगाने वाढत आहे. गुरूवारी झुकेरबर्ग यांनी दुसऱ्या नंबरवर उडी मारली आहे. या वर्षी सोशल मीडियाच्या वाढत्या नफ्यावरुन गुंतवणूकदारांमध्ये उत्साह दिसत आहे. याचा परिणाम थेट मार्क यांच्या वैयक्तिक संपत्तीत मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
मेटाच्या शेअरची किंमत
अहवालानुसार, मेटा शेअर्स गुरुवारी ५८२.७७ डॉलरच्या विक्रमी उच्च पातळीवर बंद झाले. जानेवारीच्या सुरुवातीपासून जवळजवळ ही ६८% ची वाढ आहे. तेव्हा त्यांचे शेअर्स ३४६.२९ डॉलर वर व्यवहार करत होते. वॉल स्ट्रीटवर वर्षभर मेटाच्या शेअर्सने भाव खाल्ला आहे. कंपनीने सातत्याने त्रैमासिक कमाईची नोंद केली आहे, जी विश्लेषकांच्या अंदाजापेक्षा जास्त आहे. जुलैमध्ये मेटाने सांगितले होते की दुसऱ्या तिमाहीतील विक्री २२% ने वाढून ३९.०७ अब्ज झाली आहे. हे सलग चौथ्या तिमाहीत २०% पेक्षा जास्त महसूल वाढ आहे.
भारतीय श्रीमंत कुठे?
एकीकडे मार्क झुकरबर्ग यांच्या संपत्तीत वाढ होत आहे. तर दुसरीकडे भारतीय श्रीमंतांच्या क्रमांकात घसरण होत आहे. इराण आणि इस्रायल तणावाचा परिणाम जगभरातील शेअर बाजारावर पाहायला मिळत आहे. भारतीय उद्योगपती मुकेश अंबानींच्या रिलायन्स आणि अदानी समूहाच्या कंपन्यांनाही याचा फटका सहन करावा लागला. परिणामी श्रीमंतांच्या यादीतील मुकेश अंबानी-गौतम अदानी यांच्या मानांकनावरही परिणाम झाला आहे. या दोन्ही भारतीय अब्जाधीशांच्या संपत्तीत किती घट झाली आहे.
या घसरणीचा परिणाम मुकेश अंबानी यांच्या संपत्तीवरही दिसून आला. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, रिलायन्सच्या चेअरमनच्या नेट वर्थमध्ये गेल्या २४ तासांत ४.२९ अब्ज डॉलर्स किंवा सुमारे ३६००० कोटी रुपयांची घट झाली आहे. या आकडेवारीसह, ते जगातील सर्वोच्च अब्जाधीशांच्या यादीत २ स्थानांनी घसरले आहेत. आता श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानी हे १४व्या क्रमांकावर आहेत. तर अदानी यांची एकूण संपत्ती १०० अब्ज डॉलर्स झाली असून १४व्या स्थानावरून १७व्या स्थानावर घसरले आहेत.