Mark Zukerberg : फेसबुक, व्हॉट्सअॅप, इंस्टाग्राम आणि मेटा एआय हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आता आपल्या आयुष्यात एक भाग झाले आहेत. या सर्वातील समान दुवा म्हणजे मार्क झुकरबर्ग. ह्या पठ्ठ्याने कधीकाळी आपल्या मित्राला शोधण्यासाठी म्हणून फेसबुक तयार केलं. या फेसबुकच्या माध्यमातून मेटा नावाची एक अजस्त्र कंपनी आज जगभरात राज करत आहे. या कंपनीच्या नफ्यातून मार्क झुकरबर्गच्या नावावर आता मोठा विक्रम नोंदवला गेला आहे. हा विक्रम तोडणे म्हणजे क्रिकेटमधील रेकॉर्ड मोडण्याइतकं सोप्प काम नाहीये.
मेटा प्लॅटफॉर्मचे सह-संस्थापक आणि सीईओ मार्क झुकरबर्ग देखील आता २०० अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह सर्वात श्रीमंत अब्जाधीशांच्या क्लबमध्ये सामील झाले आहेत. टेस्लाचे प्रमुख इलॉन मस्क आणि ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस या तिघांनंतर आता मार्क झुकरबर्गची एन्ट्री झाली आहे.
कोण आहेत जगातील पहिले ३ श्रीमंत
ब्लूमबर्गच्या अब्जाधीश इंडेक्सने (Bloomberg's Billionaires Index) नुकतीच जगातील अब्जाधीशांची यादी जाहीर केली. यानुसार इलॉन मस्क हे २६८ अब्ज डॉलर संपत्तीसह जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. तर जेफ बेझोस हे २१६ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. आता तिसऱ्या क्रमांकावर मार्क झुकरबर्ग यांनी एन्ट्री घेतली आहे. झुकेरबर्ग यांच्या नावावर २०० अब्ज डॉलरची संपत्ती आहे. ते पहिल्यांदाच २०० बिलियन डॉलरच्या क्लबमध्ये सहभागी झाले आहेत. मार्क झुकेरबर्गच्या संपत्तीत या वर्षात ७१ अब्ज डॉलरची सर्वात मोठी वाढ झाली आहे. तर जेफ बेझोसच्या संपत्तीत ३९.३ अब्ज डॉलर आणि एलोन मस्कच्या संपत्तीत ३८.९ अब्ज डॉलरची वाढ झाली आहे.
लुईस व्हिटॉनचे अध्यक्ष बर्नार्ड अर्नॉल्ट (Bernard Arnault) २०० अब्ज डॉलर संपत्ती क्लबमध्ये सामील होण्यापासून काही पावले दूर आहेत. बर्नार्ड अर्नॉल्ट यांची १८३ अब्ज डॉलरची संपत्ती आहे. डेटाबेस कंपनी Oracle चे लॅरी एलिसन (Larry Ellison) देखील लवकरच या क्लबमध्ये सहभागी होतील. त्यांच्या नावावर १८९ अब्ज डॉलरची संपत्ती आहे. बर्नार्ड अर्नॉल्टच्या संपत्तीत यावर्षी २४.२ अब्ज डॉलरची घट झाली आहे, तर लॅरी एलिसन यांची संपत्ती ५५.६ अब्ज डॉलरने वाढली आहे.
भारतात सर्वाधिक श्रीमंत कोण?
ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांची संपत्ती ११३ अब्ज डॉलर आहे. तर अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्याकडे १०५ अब्ज डॉलरची संपत्ती आहे. मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत १६.७ बिलियनने वाढ झाली आहे तर गौतम अदानी यांची संपत्ती या वर्षात २०.९ बिलियन डॉलरने वाढली आहे.