Meta Laysoffs, Facebook: फेसबुकची मूळ कंपनी Meta Platforms Inc. ने बुधवारी, ९ नोव्हेंबरला ११ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. ही संख्या कंपनीच्या एकूण कर्मचाऱ्यांच्या १३ टक्के आहे. उत्पन्नात घट झाल्यामुळे 'मेटा'ने कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा निर्णय घेतला. META चे चीफ एक्झिक्युटिव्ह मार्क झुकरबर्ग यांनी एका ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले, "आज मी META च्या इतिहासात घेतलेले काही सर्वात कठीण निर्णय शेअर करत आहे. मी माझी टीम सुमारे १३ टक्क्यांनी कमी करण्याचा आणि ११ हजारांहून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही पूर्वीपेक्षा चांगली आणि सक्षम कंपनी बनण्यासाठी, अतिरिक्त खर्चात कपात करत आहोत आणि भरतीवरील बंदी तात्काळ वाढवण्यासाठी काही कठोर निर्णय घेत आहोत."
ज्या कर्मचार्यांना काढून टाकण्यात आले आहे त्यांना १६ आठवड्यांचा मूळ पगार (Basic Salary) मिळणार असल्याचे मेटाने म्हटले आहे. याशिवाय, तुम्ही किती वर्षे येथे काम केले आहे, त्यानुसार तुम्हाला दरवर्षी दोन आठवड्यांचा अतिरिक्त पगारही मिळेल. म्हणजेच, जर एखाद्याने १० वर्षे काम केले असेल तर त्याला १६ + २० आठवड्यांचा पगार दिला जाईल. फेसबुकची सुरुवात २००४ मध्ये झाली होती. तेव्हापासून फेसबुक दमदार कामगिरी करत होते. पण गेल्या काही काळात कमाईत घट होत असल्याने पहिल्यांदाच अशी कारवाई करण्यात आली. कंपनीच्या डिजिटल जाहिरातींच्या कमाईत कमालीची घट झाली, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
अलीकडेच मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरचे मालक एलॉन मस्क आणि मायक्रोसॉफ्ट कॉर्प यांनीही आपल्या काही मंडळींना नोकरीवरून कमी केले आहे. इलॉन मस्क ट्विटरचे सीईओ बनल्यानंतर ट्विटरने सुमारे ३ हजार ७०० लोकांना कामावरून काढून टाकले आहे. याशिवाय स्नॅपचॅटच्या मालकीची कंपनी स्नॅपनेही ऑगस्टमध्ये ले-ऑफची घोषणा केली होती. सुमारे २० टक्के कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जाईल, असे कंपनीने सांगितले होते.