Meta Hiring : काही दिवसांपूर्वीच फेसबुकची मूळ कंपनी मेटाने आपल्या कंपनीमध्ये ५ टक्के कर्मचारी कपातीची घोषणा केली आहे. मात्र, दुसरीकडे फेसबुकने भारतीयांसाठी संधीची दारे खुली केली आहेत. कंपनी बेंगळुरूमध्ये एक नवीन कार्यालय उघडत आहे. या ठिकाणी अभियांत्रिकी आणि उत्पादन विभागात नोकरभरती सुरू केली आहे. मेटा प्रवक्त्याने देखील या बातमीला दुजोरा दिला आहे.
भविष्यातील उत्पादने विकसित करण्यात मदत करू शकतील अशा सॉफ्टवेअर इंजिनिअरच्या शोधात मेटा आहे. मेटाच्या लिक्डइन पोस्टनुसार, कंपनीच्या एंटरप्राइझ इंजिनिअरींग टीमद्वारे बेंगळुरू सेंटरची स्थापना करण्यात येणार आहे. याद्वारे अंतर्गत टीम्सची उत्पादकता वाढवणारी उत्पादने तयार केली जाणार आहेत.
२०१० मध्ये मेटाची भारतात एन्ट्रीमेटाने २०१० मध्ये पहिलं ऑफिस भारतात उघडलं होतं. सध्या कंपनीचे गुरुग्राम, नवी दिल्ली, हैदराबाद, मुंबई आणि बेंगळुरू येथे कार्यालये आहेत. यामध्ये फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲप सारख्या टीमव्यतिरिक्त, विक्री, विपणन, व्यवसाय विकास, धोरण, कायदेशीर आणि वित्त विभागातील कर्मचारी समाविष्ट आहेत. पण यावेळी भारतातील मेटाचा फोकस इंजिनीअरिंग टॅलेंटवर आहे. मेटा केवळ सॉफ्टवेअरच नव्हे तर हार्डवेअर अभियंत्यांचीही भरती करत आहे.
मेटाकडून ६५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूकसध्या आर्टिफिशियल इंटेलिजेन्स अर्थात एआय क्षेत्रात मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे. गुगल, मायक्रोसॉफ्ट आणि ओपनएआय सारख्या बड्या टेक कंपन्या AI क्षेत्रात वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. अशा परिस्थितीत मेटानेही या स्पर्धेत उडी घेतली आहे. या कंपन्या भारतातील डेव्हलपर कम्युनिटीला स्वत:शी जोडण्याचा प्रयत्न करत आहेत. मेटा एआय इन्फ्रास्ट्रक्चरमध्येही मोठी गुंतवणूक करत आहे. कंपनीने AI प्रयत्नांना आणखी बळकट करण्यासाठी २०२५ पर्यंत ६० ते ६५ अब्ज डॉलर्सच्या भांडवली खर्चाची योजना आखली आहे.