Meta Layoffs : आर्थिक मंदीमुळे विविध क्षेत्रांवर परिणाम होताना दिसून येत आहे. गेल्या काही काळात जगातील अनेक लहान-मोठ्या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. दरम्यान, फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्रामची पॅरेंट कंपनी मेटा आपल्या विविध प्लॅटफॉर्मवर आणखी 10,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार आहे. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये हा दावा करण्यात आला आहे. यापूर्वी मेटा कंपनीने नोव्हेंबर 2022 मध्ये 11 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते.
कर्मचाऱ्यांची कपात केल्यानंतर मेटामधील कर्मचाऱ्यांची संख्या 2021 च्या मध्यापर्यंत असणार आहे. कोरोनाच्या काळात कंपनीने 2020 पासून जबरदस्त नोकरभरती केली होती. कंपनीने प्रोफेशनल सोशल मीडिया प्लॅटफॉर्म LinkedIn च्या माध्यमातून या कर्मचारी कपातीची माहिती दिली आहे. या कपातीमध्ये अॅड सेल्स टीम, मार्केटिंग आणि पार्टनरशिप टीमचे कर्मचारी असणार आहेत.
दरम्यान, मार्चच्या सुरुवातीला कंपनीने सांगितले होते की, आपल्या नियोक्ता टीमचा आकार कमी करेल आणि एप्रिलच्या शेवटी आपल्या टेक्नॉलॉजी ग्रुपमधील आणखी लोकांना काढून टाकेल. त्यानंतर मे महिन्याच्या अखेरीस व्यापारी समूहातील लोकांना काढून टाकले जाईल. याशिवाय, मेटाचे मुख्य कार्यकारी मार्क झुकरबर्ग म्हणाले होते की, "हे अवघड असेल पण दुसरा कोणताही मार्ग नाही. याचा अर्थ आमच्या यशाचा एक भाग असलेल्या प्रतिभावान आणि उत्साही सहकाऱ्यांना निरोप देणे असा आहे."