ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ४ - सॅमसंगसारख्या परदेशी कंपन्यांना धूळ चारत मायक्रोमॅक्स या अस्सल भारतीय कंपनीने पहिल्यांदाच देशाच्या स्मार्टफोन मार्केटमध्ये नंबर वनची जागा पटकावली आहे. भारतात स्मार्टफोन मार्केटमध्ये मायक्रोमॅक्सचा हिस्सा २२ टक्क्यांवर आला असून सॅमसंगचा हिस्सा २० टक्क्यांवर घसरला आहे.
मोबाईल विक्रीविषयी संशोधन करणा-या एका संस्थेने ऑक्टोंबर ते डिसेंबर या तिमाहीत भारतात स्मार्टफोन कॅटेगरीत झालेल्या मोबाईल विक्रीचा अहवाल जाहीर केला आहे. यामध्ये पहिल्यांदाच मायक्रोमॅक्सने सॅमसंगला पछाडले आहे. मायक्रोमॅक्सचे ९ हजार ते १२ हजार या रेंजमधील स्मार्टफोन्स युजर्सना भावले असून यामुळेच मायक्रोमॅक्सने नंबर वनची जागा पटकावली असे निरीक्षण या अहवालात नोंदवण्यात आले आहे. मायक्रोमॅक्सने अन्य कंपन्यांपेक्षा जास्त वेगाने स्मार्टफोन्समध्ये बदल केले असून जास्तीत जास्त स्थानिक भाषांचा या फोनमध्ये समावेश केल्याने मायक्रोमॅक्सची भारतात चलती असल्याचे अहवालात म्हटले आहे. लाव्हा या अन्य भारतीय कंपनीने चांगली बॅटरी लाइफ असलेले स्मार्टफोन स्वस्तात बाजारात आणल्याने याद्वारे मध्यमवर्गीयांना आकर्षित करण्याचा प्रयत्न कंपनीने केल्याचे रिसर्च करणा-या संस्थेचे अधिकारी सांगतात. गेल्या तिमाहीत भारतातील मोबाईल फोन्सच्या विक्रीत तब्बल ९० टक्क्यांची वाढ झाल्याचे अहवालातून समोर येते. तिमाहीत मायक्रोमॅक्स व सॅमसंग अनुक्रमे पहिल्या व दुस-या स्थानावर आहेत. तर कार्बन व लाव्हा या कंपन्यांनी अनुक्रमे तिसरा आणि चौथा क्रमांक पटकावला आहे. तिस-या व चौथ्या स्थानासाठी या कंपन्यांमध्ये चढाओढ सुरु असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.