ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. ५ - भारतातील मोबाईल जगतामध्ये स्वदेशी मायक्रोमॅक्सने परदेशी सॅमसंगवर मात करत मोबाईल मार्केटमध्ये अव्वल क्रमांक गाठला आहे. भारतातील मोबाईल मार्केटमध्ये मायक्रोमॅक्सचा वाटा १६.६ टक्क्यांवर पोहोचला असून सॅमसंगचा वाटा १४. ४ टक्क्यांवर आला आहे.
एका खासगी संस्थेने एप्रिल - जूनच्या तिमाहीद्वारे मोबाईल मार्केटविषयी एक अहवाल तयार केला आहे. यानुसार भारतातील एकूण मोबाईल मार्केटमध्ये दोन टक्क्यांनी वाढ झाली. यामध्ये सर्वाधिक वाढ स्मार्टफोनमध्ये (६८ टक्के) झाली. भारतातील मोबाईल मार्केटमध्ये मायक्रोमॅक्सने यंदा पहिला क्रमांक पटकावला आहे. त्याखालोखाल सॅमसंग (१४.४%), नोकिया (१०.९%), कार्बन (९.५%) यांचा नंबर लागतो. लाव्हाने आता टॉप ५ मध्ये स्थान मिळवले आहे. लाव्हाचा मार्केटमधील वाटा ५.६ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.
मोबाईल मार्केटमध्ये स्मार्टफोन कॅटेगरीमध्ये सॅमसंगने पहिला क्रमांक कायम ठेवला आहे. स्मार्टफोन्समध्ये सॅमसंगचा वाटा तब्बल २५.३ टक्के ऐवढा असून मायक्रोमॅक्सचा १९.१ टक्के ऐवढा आहे. स्मार्टफोन कॅटेगरीमध्ये मोटोरोलाने भरारी घेतली आहे. स्मार्टफोनमध्ये कार्बन तिस-या, मोटोरोला चौथ्या आणि नोकिया पाचव्या स्थानावर आहे. जानेवारी - एप्रिल या तिमाहीत सॅमसंगचा मार्केटमधील वाटा १६ टक्के तर मायक्रोमॅक्सचा १३ टक्के ऐवढा होता.