मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक आणि अब्जाधीश बिल गेट्स यांनी मंगळवारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) मुंबईतील मुख्यालयाला भेट दिली. यादरम्यान त्यांनी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांची भेट घेतली. रिझर्व्ह बँकेने ट्विटरवर या बैठकीचे फोटो शेअर केले आहेत. "बिल गेट्स यांनी आरबीआयच्या मुंबई कार्यालयाला भेट दिली आणि गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली,” असे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. विशेष म्हणजे, बिल गेट्स भारतात आरोग्य आणि शिक्षण तसेच इतर क्षेत्रातील व्यवसायाच्या संधी शोधण्यासाठी दौऱ्यावर आले आहेत.
या भेटीत शक्तीकांत दास यांनी बिल गेट्स यांना एक पुस्तकही दिले. बिल गेट्स यांनी नुकतीच भारतात व्यवसाय करण्याची इच्छा व्यक्त केली होती. "इतर देशांप्रमाणेच भारताकडेही मर्यादित संसाधने आहेत, परंतु या देशाने दाखवून दिले आहे की अडथळ्यांसहही प्रगती कशी करता येते,” असे बिल गेट्स यांनी २७ फेब्रुवारी रोजी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले होते.
Mr.@BillGates visited RBI Mumbai today and held wide ranging discussions with Governor @DasShaktikanta
— ReserveBankOfIndia (@RBI) February 28, 2023
#RBI#rbitoday#rbigovernor#shaktikantadas#BillGatespic.twitter.com/WKOsxzcgHi
आरोग्य क्षेत्रातील संधी
“जगातील सुमारे २० टक्के लोकसंख्या भारतात राहते. आरोग्य क्षेत्रात भारताची प्रगती वाखाणण्याजोगी आहे. देशातील बालमृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे. त्यांनी नवीन लसी आणल्या आहेत आणि आरोग्य सेवांची व्याप्ती वाढली आहे. परंतु, बरेच काही करणे बाकी आहे. भारताचे मॉडेल संपूर्ण जगाला मदत करेल. इथे येऊन प्रगती बघून आनंद झाला,” असे त्यांनी ट्वीटसह शेअर केलेल्या व्हिडीओत म्हटलेय.
कोणत्या मुद्द्यांवर चर्चा
CNBC TV18 नुसार, शक्तिकांत दास यांच्यासोबत झालेल्या बैठकीत बिल गेट्स यांनी फायनॅन्शिअल इंक्लुजन, पेमेंट सिस्टम, मायक्रो फायनान्स आणि डिजिटल कर्ज देण्याबाबत चर्चा केली. बिल गेट्स १ मार्च रोजी भारताच्या रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेणार आहेत. ते G20 अंतर्गत भारतातील डिजिटल पायाभूत सुविधांवर त्यांच्याशी चर्चा करतील.