जगातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर कंपनी मायक्रोसॉफ्ट (Microsoft Corp.) ने सत्या नाडेला (Satya Nadella) यांच्या खांद्यावर सर्वात मोठी जबाबदारी सोपविली आहे. अनिवासी भारतीय असलेल्या नाडेलांनी गेली ७ वर्षे कंपनीचे यशस्वी सारथ्य केल्याने त्याची बक्षिसी देण्यात आली आहे. त्यांच्या नेतृत्वात कंपनीने मोठे यश संपादन केले आहे. (Microsoft on Wednesday named chief executive Satya Nadella as chair of its board)
सत्या नाडेला हे मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष झाले आहेत. ते जॉन थॉमसन यांची जागा घेणार आहेत. थॉमसन यांना २०१४ मध्ये अध्यक्ष बनविण्यात आले होते. त्या आधी ते कंपनीच्या संचालक मंडळावर प्रमुख स्वतंत्र संचालक होते. नाडेला यांना देखील २०१४ मध्येच मायक्रोस़ॉफ्टचा सीईओ बनविण्यात आले होते. तेव्हा कंपनी मोठ्या संकटातून जात होती. मायक्रोसॉफ्टचे अनेक प्रयोग फसले होते. यामध्ये नोकिया-विंडोज ओएसचा देखील समावेश होता. नाडेला यांनी या संकटातून कंपनीला बाहेरच काढले नाही तर त्यांनी क्लाऊड कॉम्प्युटिंग, मोबाईल अॅप्लिकेशन आणि आर्टिफिशिअल इन्टेलिजन्सवर लक्ष वळविले आणि पारंपरिक सॉफ्टवेअर निर्मितीलाही चांगले दिवस दाखविले.
शेअरमध्येही मोठी वाढ...त्यांच्या कार्यकाळात मायक्रोसॉफ्टच्या समभागांमध्ये तब्बल सात पटींनी वाढ झाली. कंपनीचे बाजारमुल्य २ लाख कोटींवर जाऊन पोहोचले आहे. नाडेला कंपनीचे तिसरे सीईओ आणि तिसरे चेअरमन असणार आहेत. या आधी बिल गेट्स, थॉमसन या जागी होते. नाडेला या आधी स्टीव्ह बाल्मर कंपनीचे सीईओ राहिलेले आहेत.
हैदराबाद ते अमेरिका प्रवास...सत्या नाडेला यांनी हैदराबादमध्ये शिक्षण घेतले आहे. त्यांचा १९६७ मध्ये जन्म झाला होता. त्यांचे वडील प्रशासकीय अधिकारी आणि त्यांची आई संस्कृत शिक्षिका होती. १९८८ मध्ये त्यांनी मनिपाल इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजीमधून इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग पदवी मिळविली. यानंतर त्यांनी कॉम्प्युटर सायन्समध्ये एमएस करत अमेरिका गाठली.