टेक क्षेत्रात कर्मचारी कपात करणाऱ्या कंपन्यांमध्ये आता लिंक्डइनचे (LinkedIn) नावही जोडले गेले आहे. या कंपनीनं आता आपल्या कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय घेतलाय. विशेष बाब म्हणजे युजर्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर नोकऱ्या शोधण्यासाठी करतात आणि आता या कंपनीने कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. रिपोर्ट्सनुसार, कंपनीने रिक्रूटमेंट विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. लिंक्डइनने किती जणांना नारळ दिलाय हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.
LinkedIn ही अमेरिकन टेक कंपनी मायक्रोसॉफ्टच्या मालकीची आहे आणि हे एक विशेष सोशल नेटवर्क आहे जिथे युझर्स नोकऱ्यांच्या शोधात येतात. द इन्फॉर्मेशन या न्यूज वेबसाईटच्या रिपोर्टनुसार, कंपनीच्या रिक्रूटिंग विभागातील कर्मचाऱ्यांना नोकरीवरून कमी करण्यात आले आहे. गेल्या काही महिन्यांपासून टेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांची कपात करत आहेत. टेक कंपन्या आपला खर्च कमी करण्यासाठी कर्मचारी कपातीचा अवलंब करत आहेत. आता लिंक्डइनही यात सामील झाले आहे.
६१७ कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता
नुकतेच मायक्रोसॉफ्टने वेगवेगळ्या विभागात कर्मचारी कपात करणार असल्याचे म्हटले आहे. कंपनीने HoloLens, Surface आणि Xbox च्या टीमसह हार्डवेअर विभागात काम करणाऱ्या लोकांना कामावरून काढून टाकले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मायक्रोसॉफ्टने सिएटल ऑफिसमध्ये काम करणाऱ्या ६१७ कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. यामुळे होलोलेन्सच्या थर्ड जनरेशन मिक्स्ड रिॲलिटी हँडसेटच्या भविष्याविषयी प्रश्न निर्माण झाले आहेत.
GitHub मध्येही कर्मचारी कपात
गेल्या आठवड्यात, मायक्रोसॉफ्टच्या सॉफ्टवेअर कोलॅबोरेशन प्लॅटफॉर्म गिटहबने कर्मचारी संख्या १० टक्क्यांनी कमी करण्याची घोषणा केली आहे. या कंपनीत सुमारे तीन हजार कर्मचारी काम करतात. याशिवाय कंपनीने नवीन भरती थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीची स्थिती सुधारण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.