नवी दिल्ली : वर्षाच्या तुलनेत यंदा महागाईचा दर कमी झाला असला तरीही दैनंदिन वापराच्या वस्तूंचे दर चढे असल्याने ते मध्यम वर्गीयांच्या खिशाला चांगलीच कात्री लावत आहेत. डाळी, तयार खाद्यपदार्थ, जळवस्तू, कपडे यांच्यासोबत शिक्षण आणि आरोग्य सेवेचा खर्च सर्वच महागल्याने मध्यम वर्गीय भरडून निघाले आहेत, असे ‘असोचेम’ या औद्योगिक मंडळाच्या पाहणीत आढळून आले आहे.किरकोळ मूल्य सूचकांकाचा (सीपीआय) विचार करता डाळीचे दर ३० टक्क्यांनी वाढले आहेत. काही डाळींचे भाव तर २०० रुपये प्रति किलोवर गेले आहेत, तर कढी बनविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मसाल्यांचे भावही ९.२ टक्क्यांनी वाढले आहेत.तशात आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे भाव घसरले आहेत आणि वेतनात किरकोळ वाढ झाली आहे, असे असूनही शिक्षण आणि आरोग्य सेवा महागल्या आहेत. मध्यम वर्गीयांसाठी ही दोन्ही क्षेत्रे महत्त्वपूर्ण आहेत. ठोक मूल्य सूचकांकाशी निगडित महागाईपेक्षा या दोन्ही क्षेत्रांतील महागाई प्रचंड वाढली आहे. सप्टेंबर २०१५ मध्ये सीपीआयवर आधारित महागाईचा दर ४.४१ टक्के राहिला. वर्षभरापूर्वी तो ६.४ टक्के होता. ठोक मूल्य सूचकांकावर आधारित महागाई सप्टेंबरमध्ये शून्याहून ४.५४ टक्के खाली राहिली. गेल्या वर्षी याच महिन्यात हा महागाईचा दर शून्याहून ४.९५ टक्के कमी होता.असोचेमचे महासचिव डी. एस. रावत म्हणाले की, शिक्षण आणि आरोग्य या दोन्ही क्षेत्रात वार्षिक महागाईचा दर फार मोठ्या प्रमाणावर वाढलेला नसला तरीही तो मध्यम वर्गीयांच्या कक्षेच्या अगोदरपासून बाहेर आहे. दिल्लीत तर अशी काही इस्पितळे आहेत की, तेथे सर्वसामान्य माणूस जाऊच शकत नाही. शिक्षण आणि आरोग्य या दोन्ही क्षेत्रांवर केंद्र आणि राज्य सरकारांनी अधिक खर्च करण्याची गरज आहे.डेंग्यू आणि स्वाईन फ्ल्यू यासारख्या रोगांचा फैलाव झाल्याने सरकारी आरोग्य सेवेचा भंडाफोड झाला आहे. या आरोग्यावरील सरकारी खर्च कमी कमी होत आहे.चलनवाढीचा दर कमी झाल्याने रिझर्व्ह बँकेने व्याजदर ०.५० टक्क्यांनी घटविले. सरकार आणि रिझर्व्ह बँकेचे दडपण असूनही बँकांनी व्याज दरातील कपात ०.३० टक्क्यांपेक्षा कमी केलेली नाही, असेही असोचेमचे म्हणणे आहे.
महागाईपासून मध्यम वर्गीयांची सुटका नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2015 11:05 PM