Join us

मध्यपूर्वेतील देश कंगाल होण्याच्या मार्गावर!

By admin | Published: October 27, 2015 11:12 PM

जमिनीखाली खनिज तेलाच्या रूपाने ‘काळे सोने’ सापडल्याने गेली सुमारे आठ दशके कुबेरी श्रीमंतीत पैशांच्या राशींवर लोळणाऱ्या इराक, सौदी अरबस्तान व लिबिया यांसह मध्यपूर्वेतील अनेक देशांच्या तिजोऱ्यांमध्ये

लंडन : जमिनीखाली खनिज तेलाच्या रूपाने ‘काळे सोने’ सापडल्याने गेली सुमारे आठ दशके कुबेरी श्रीमंतीत पैशांच्या राशींवर लोळणाऱ्या इराक, सौदी अरबस्तान व लिबिया यांसह मध्यपूर्वेतील अनेक देशांच्या तिजोऱ्यांमध्ये, तेलाच्या किंमती न भूतो गडगडल्याने, येत्या पाच वर्षांत खडखडाट होण्याची भीती आहे, असा इशारा आंतरराष्ट्रीय नाणे निधीने (आयएमएफ) दिला आहे.नाणेनिधीतील अर्थतज्ज्ञांनी आंतरराष्ट्रीय बाजारपेठांत तेलाच्या सतत घसरत चाललेल्या किंमती आणि त्यांचा या देशांच्या अर्थव्यवस्थांवर होणारा परिणाम यांचा तौलनिक अभ्यास करून तयार केलेल्या ताज्या अहवालात हा इशारा देण्यात आला आहे.नाणे निधी म्हणते की, गेल्या वर्षभरात तेलाच्या किंमती निम्म्याहून कमी झाल्यानंतर कुवेत, कातार व संयुक्त अरब अमिरात यासारख्या मध्यपूर्वेतील काही देशांनी प्रामुख्याने तेलावर विसंबून असलेल्या आपल्या अर्थव्यवस्था नव्या क्षेत्रांकडे वळवून तेलावरील अवलंबित्व कमी केले. परंतु इराक, इराण, ओमान, अल्जेरिया, सौदी अरबस्तान, बहारिन, लिबिया व येमेन या देशांनी वेळीच सावध होऊन पावले उचलली नाहीत. परिणामी आज या देशांची अर्थ संकल्पीय तूट एवढी अनियंत्रित प्रमाणात वाढली आहे की अजूनही त्यांनी अर्थव्यवस्थेचा रोख तेलाखेरीज अन्य क्षेत्रांकडे वळविला नाही किंवा मोठी कर्जे काढली नाहीत तर येत्या पाच किंवा त्याहूनही कमी वर्षांत त्यांच्या तिजोऱ्यांमध्ये खडखडाट होईल.नाणे निधीच्या अभ्यासानुसार या देशांपैकी इराणची अर्थव्यवस्था इतरांच्या तुलनेत तेलावर कमी विसंबून असल्याने लिबिया व येमेन या गृहयुद्धांनी ग्रासलेल्या अन्य देशांच्या तुलनेत इराण सध्याच्या अडचणीच्या काळात अधिक चांगल्या प्रकारे तग धरण्याची अपेक्षा आहे.तेल निर्यात करणाऱ्या सर्वच देशांनी कमी झालेल्या तेलाच्या किंमतींशी जुळवून घेण्यासाठी कंबर कसण्याची गरज आहे. कुवेत, कातार व संयुक्त अरब अमिरात यासारखे देश मोठ्या राखीव निधींच्या गंगाजळी असल्याने तेलाच्या घसरत्या किंमतीच्या वातावरणातही पुढील २० वर्षे तग धरू शकत असले तरी त्यांनीही अर्थव्यवस्थेचे तेलावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी पावले उचलण्याची गरज आहे कारण तेलाच्या किंमती नजिकच्या भविष्यातही अशाच खालच्या पातळीवर राहण्याची चिन्हे आहेत. (वृत्तसंस्था)