नवी दिल्ली - देशभरात विकल्या जाणाऱ्या दुधाबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशात विकल्या जाणाऱ्या दुधापैकी 68.7 टक्के दूध आणि दुग्धजन्य पदार्थांत भेसळ असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. अॅनिमल वेल्फेअर बोर्डाचे सदस्य मोहनसिंह अलुवालियांनी यांनी याबाबत माहिती दिली. फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अॅथोरिटी ऑफ इंडियाने ठरवून दिलेल्या मानकांनुसार हे दुग्धजन्य पदार्थ बनिवण्यात येत नाहीत.
देशात मोठ्या प्रमाणात दूध आणि दुग्धजन्य पदार्थ तयार केले जातात आणि सहजपणे विकलेही जातात. अनेक मोठ्या ब्रँडसह स्थानिक क्षेत्रातही दूध आणि दुग्धजन्य पदार्थ बनविणाऱ्या डेअरी उभारण्यात आल्या आहेत. त्यामुळे या डेअरींमधूनही मोठ्या प्रमाणात दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन केलं जाते. विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या एका अहवालानुसार, भेसळ होणाऱ्या जवळपास 89 टक्के पदार्थांमध्ये एक किंवा दोन प्रकारची भेसळ करण्यात येते. या अहवालानुसार 31 मार्च 2018 पर्यंत देशात दुधाचे उत्पादन दररोज 14.68 कोटी लिटर एवढे नोंद करण्यात आले आहे. तर देशात दुधाचे प्रति व्यक्ती विक्री 480 ग्रॅम प्रति दिवस दिसून येत असल्याचे अहलूवालिया यांनी सांगितले.
अहलूवालिया यांच्यामते दुधातील भेसळमध्ये उत्तरेकडील राज्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. काही वर्षांपूर्वी दूध भेसळीच्या मुद्द्यावरुन देशात एक सर्वेक्षण झाले होते. त्यानुसार, दूध पॅकिंग करताना, सफाई आणि स्वच्छता यांची अजिबात काळजी घेतली जात नाही. तर दुधात पावडरची सहजपणे भेसळ केली जाते, जी ग्राहकांच्या आरोग्यासाठी हानीकारक आहे. ज्यामुळे ग्राहक किंवा हे दुध वापरणाऱ्या नागरिकांना शारिरीक अपंगत्व येण्याची शक्यता आहे.