Join us

Milk Price Hike: अमूलनंतर या दोन बड्या कंपन्यांचेही दूध महागणार; सांगितले दरवाढीचे कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2022 12:31 PM

Milk Price Hike: सोमवारी अमूलने दूध दर वाढविण्याची घोषणा केली होती. यानंतर अन्य कंपन्यादेखील दरवाढ करत आहेत.

अमूल (Amul) कंपनीने दूध दरवाढीची घोषणा केल्याच्या दुसऱ्याच दिवशी आणखी दोन बड्या कंपन्यांनी दूधाच्या किंमतीत वाढ करण्याची घोषणा केली आहे. यामुळे सामान्यांच्या खिशावर चांगलाच भार पडणार आहे. केवळ डीमार्टमध्येच तुम्हाला दूध बाजारातील किंमतीपेक्षा स्वस्त मिळणार आहे. 

देशातील प्रमुख एफएमसीजी डेयरी कंपनी पराग मिल्क फूड्स लिमिटेड (Parag Milk Foods Ltd) ने देखील दूधाच्या दरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. या कंपनीचा गोवर्धन हा ब्रँड आहे. गोवर्धन दूधाच्या दरात दोन रुपये प्रती लीटरची वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ आजपासूनच लागू होणार आहे. यामुळे गोवर्धन गोल्ड मिल्क (Gowardhan Gold) ची किंमत 48 रुपयांवरून वाढून 50 रुपये होणार आहे. गोवर्धन फ्रेश (Gowardhan fresh) ची किंमत 46 रुपयांनी वाढून 48 रुपये झाली आहे. 

कंपनीचे अध्यक्ष देवेंद्र शाह यांनी सांगितले की, जवळपास तीन वर्षांनंतर दूधाच्या दरात वाढ करण्यात आली आहे. वीज, पॅकेजिंग, वाहतूक आणि खाद्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. यामुळे कंपनीकडे दुधाच्या दरात वाढ करण्याशिवाय कोणताही पर्याय राहिला नव्हता. याचसोबत ट्रेड डिस्काऊंट आणि अन्य खर्चामध्ये कपात करण्यात आली आहे. 

सोमवारी अमूलने दूध दर वाढविण्याची घोषणा केली होती. यानंतर आता मदर डेअरीने (Mother Dairy) देखील दरवाढीचे संकेत दिले आहेत. आम्ही परिस्थितीवर नजर ठेवून आहोत. खर्चात खूप वाढ झाली आहे. जुलै २०२१ पासून सर्वच खर्चामध्ये ८ ते ९ टक्के वाढ झाली आहे. यामुळे परिस्थिती पाहून आम्ही निर्णय घेणार आहोत. 

टॅग्स :दूध