नवी दिल्ली : आगामी सणांमध्ये दुधापासून बनवलेली मिठाई महाग होऊ शकते. एकीकडे जनावरांमध्ये रोगराई पसरल्याने दूध उत्पादनावर परिणाम झाला आहे. दुसरीकडे, जनावरांना लागणाऱ्या महागड्या चाऱ्यांमुळे दूध स्वस्त होण्याची शक्यता कमी असून महाग होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. देशातील प्रमुख दूध उत्पादक राज्यांमध्ये दुभत्या जनावरांमध्ये लंपी स्किन रोगाचा प्रादुर्भाव झाला असून त्यामुळे दूध उत्पादनावर परिणाम झाला आहे.
गुजरात आणि राजस्थानपाठोपाठ आता मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात हा आजार पसरला आहे. उत्तर प्रदेशनंतर या राज्यांमध्ये दुधाचे सर्वाधिक उत्पादन होते. याचबरोबर, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पशुखाद्य 15-17 टक्क्यांनी महागले आहे. म्हणजेच दुग्धोत्पादनात पशुपालकांचा खर्च वाढला आणि चारा महाग झाला. मात्र, त्यानुसार दुधाच्या किमतीतही वाढ झाली नाही. पण, आता महागडा चारा दुधाचे दर वाढण्याची भीती अधिक बळकट करत आहे.
दरम्यान, मदर डेअरी आणि अमूल या दोन्ही कंपन्यांनी गेल्या महिन्यात दुधाच्या दरात प्रत्येकी 2 रुपयांनी वाढ केली होती. सहा महिन्यांत दुधाच्या दरात झालेली ही सलग दुसरी वाढ आहे. याआधी 6 मार्च रोजी मदर डेअरी, अमूल आणि पराग मिल्कनेही त्यांच्या दुग्धजन्य पदार्थांच्या दरात प्रतिलिटर 2 रुपयांची वाढ केली होती. म्हणजेच पराग आणि मदर डेअरीची उत्पादने 6 महिन्यांत 4 रुपयांनी महागली आहेत.
दुधातील भेसळ ओळखण्यासाठी टिप्स...>> दुधात किती पाणी आहे किंवा इतर काही भेसळीचे पदार्थ आहेत की नाही, हे ओळखण्याची ही सर्वात जुनी आणि सोपी पद्धत. यासाठी स्वयंपाक घरातील लाटणं किंवा मग त्यासारखीच एखादी गुळगुळीत लाकडी काडी वापरा. लाटणं उभं धरा आणि त्याच्या वरच्या टोकावर दुधाचे काही थेंब टाका. दुध खाली घसरलं आणि पांढरट ओघळ दिसला तर दूध शुद्ध आहे. जर दूध खाली घसरूनही पांढरट ओघळ दिसला नाही, तर ते भेसळयुक्त आहे.>> दुधामध्ये आयोडिनचे काही थेंब टाकून बघा. दुधाचा रंग बदलून निळसर झाला तर ते भेसळीचं आहे, हे समजावं.>> दूध हातावर ओता आणि हात एकमेकांवर रगडा. जर हात तेलकट झाले तर ते भेसळयुक्त आहे. शुद्ध दुधात एवढा तेलकटपणा नसतो.>> दूध उकळून जेव्हा आटतं तेव्हा जर त्यात लहान लहान गाठी दिसत असतील, तर ते भेसळीचं आहे. शुद्ध दूध आटतं आणि त्याचा रंग बदलतो. पण त्यात गाठी होत नाहीत. >> दुधामध्ये सोयाबिन पावडर टाका. यानंतर काही वेळाने त्यात लाल रंगाचा लिटमस पेपर बुडवा. लिटमस पेपरचा रंग निळा झाला तर दूध भेसळीचं आहे. रंग बदलला नाही, तर दूध शुद्ध आहे, हे ओळखावे.