Milk Prices drop: देशभरात झपाट्याने वाढणाऱ्या महागाईत सर्वसामान्यांना काही अंशी लवकरच दिलासा मिळू शकतो. महागड्या टोमॅटोचा दर हळूहळू का होईना, कमी होत आहे. त्यानंतर आता दुधाच्या किमती (Milk Price Down) देखील लवकरच कमी होऊ शकतात असे सांगितले जात आहे. म्हणजेच तुम्हाला स्वस्त दूध मिळू शकते अशी शक्यता आहे. पावसाळ्यानंतर दुधाच्या दरात घसरण होऊ शकते, असे केंद्र सरकारचे मत आहे.
वर्षभरात दुधाचे दर 10 टक्क्यांनी वाढले
गेल्या वर्षभरात देशात दुधाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. अमूलपासून मदर डेअरीपर्यंत सर्वच कंपन्यांनी दर वाढवले आहेत. भारतातील दुधाच्या दरात गेल्या 3 वर्षात 22 टक्के वाढ झाली आहे, त्यापैकी गेल्या एका वर्षात झालेली वाढ ही 10 टक्के इतकी आहे. केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धमंत्री परशोत्तम रुपाला यांच्या म्हणण्यानुसार, सध्या हिरव्या चाऱ्याच्या किमतीत घसरण होताना दिसत आहे. त्याचबरोबर पावसाळ्यानंतर दुधाचे दरही खाली येण्याची शक्यता आहे.
हवामानाचा परिणाम
मीडिया रिपोर्ट्सनुसार, रुपाला यांनी मुलाखतीत म्हटले आहे की, हवामानाच्या अति बदलामुळे पिकांना नुकसान सहन करावे लागत आहे. या क्षणी काळजी करण्यासारखे काही नाही. सध्या, सरकार दूध उत्पादकता सुधारण्यासाठी हवामान प्रतिरोधक गोष्टींवर काम करत आहे. चाऱ्याच्या घाऊक किंमत निर्देशांकातही घसरण होत आहे. पावसाळ्यानंतर, हिवाळा हंगाम सुरू होतो, ज्यामध्ये भाव कमी होऊ शकतात. हे पाहता पावसाळ्यानंतर दुधाचे दर स्थिर होतील, अशी आशा आहे.
किंमती कशा ठरवल्या जातात?
दुधाच्या दराबाबत बोलायचे झाले तर पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाकडून दुधाचे दर निश्चित केले जात नाहीत. या किमती सहकारी आणि खासगी डेअरीद्वारे निश्चित केल्या जातात. किमती केवळ उत्पादन खर्च आणि बाजारातील इतर काही गोष्टींट्या आधारावर निश्चित केल्या जातात. यासोबतच दूध हे नाशवंत उत्पादन आहे, त्यामुळे ते जास्त काळ साठवून ठेवणे फार कठीण आहे.