Join us  

महागाईचा फटका! सामान्यांच्या खिशाला कात्री लागणार; दुधासह सर्व डेअरी प्रोडक्ट्स महागणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2022 2:30 PM

देशातील महागाईचा परिणाम आता दुधाच्या दरावरही दिसून येणार आहे. डेअरी कंपन्या लवकरच दर वाढवू शकतात.

नवी दिल्ली - भाज्या, फळं, धान्य, कपडे, साबण, शॅम्पू, पावडर यासह अनेक वस्तू महाग झाल्या आहेत. रोजच्या वापरातील काही गोष्टींसाठी आता जास्तीचे पैसे मोजावे लागत आहेत. कोरोनानंतर आता महागाईने सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं आहे. याच दरम्यान आता सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री लागणार आहे. देशातील महागाईचा परिणाम आता दुधाच्या दरावरही दिसून येणार आहे. डेअरी कंपन्या लवकरच दर वाढवू शकतात. काही दिवसांपूर्वी स्किम्ड मिल्क पावडर तसेच पशुखाद्याचे दर वाढले आहेत. 

आयसीआयसीआय सिक्युरिटीजच्या तज्ज्ञांनी शुक्रवारी दिलेल्या माहितीनुसार, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत किंमती वाढू शकतात. "आमच्या कव्हरेज अंतर्गत, सर्व डेअरी कंपन्या किंमती 5 ते 8 टक्क्यांपर्यंत वाढवू शकतात. दुधाचे वाढते दर हा चिंतेचा विषय आहे. सर्व डेअरी कंपन्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत किमती वाढवतील" असं म्हटलं आहे. 

कमी उत्पादन आणि वाढीव खर्चाचे कारण

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही वर्षांत घरांसोबतच हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्समुळे दुधाची मागणी झपाट्याने वाढली आहे. त्यामुळेच दुधाचे दर वाढले आहेत. पशुखाद्याचे  किमतीत झालेली वाढ आणि उष्णतेमुळे दूध उत्पादनात झालेली घट याचाही भावावर परिणाम झाल्याचे त्यांनी सांगितले. परिणामी घाऊक दुधाचे दर वर्षानुवर्षे वाढतच आहेत. उदाहरणार्थ, जूनमध्ये घाऊक दुधाच्या किमती 5.8% ने वाढल्या होत्या. दक्षिण भारतात दुधाचे दर वर्षाला 3.4% वाढले आहेत.

निर्यात वाढल्याने दूध होणार महाग 

दैनंदिन वस्तूंच्या किमती वाढल्याने जनतेला महागाईचा सामना करावा लागत आहे. कंपन्यांना कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमतीचाही सामना करावा लागत आहे. उदाहरणार्थ, स्किम्ड मिल्क पावडरच्या किमती गेल्या 12 महिन्यांत सातत्याने वाढल्या आहेत, दर वर्षी 26.3% आणि जूनमध्ये दर-महिन्यात 3% वाढ झाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :दूधमहागाई