Join us  

भारतात झपाट्याने वाढतीये श्रीमंतांची संख्या; जाणून घ्या देशात किती कोट्यधीश..?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2023 7:35 PM

श्रीमंतांच्या संख्येत झालेली ही वाढ देशाच्या विकासाचा दर वाढण्याचे लक्षण आहे.

गेल्या काही काळापासून भारतात कोट्यधीशांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यंदाच्या आयकर रिटर्न फायलिंग डेटाच्या विश्लेषणातून हा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या माहितीनुसार, देशात 1 कोटींहून अधिक कमाई करणाऱ्या करदात्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. विशेषतः कोरोनाच्या काळापासून तेजी पाहायला मिळत आहे. श्रीमंतांच्या संख्येत झालेली ही वाढ देशाच्या विकासाचा दर वाढण्याचे लक्षण आहे.

संख्या 50टक्क्यांनी वाढली2022-23 च्या आयकर रिटर्न फायलिंग डेटानुसार, आयटीआर फाइल करणाऱ्यांमध्ये 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या करदात्यांची संख्या 2.69 लाख आहे. हा आकडा 2018-19 मधील 1.80 लाखांपेक्षा 49.4 टक्के अधिक आहे. 2021-22 मध्ये 1 कोटींहून अधिक कमाई करणाऱ्यांची संख्या 1.93 लाख होती. गेल्या 4 वर्षांत 1 कोटींहून अधिक कमाई करणाऱ्यांच्या संख्येत 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 

1 कोटींहून अधिक आयकर भरणाऱ्या करदात्यांच्या संख्येत 2019-20 च्या तुलनेत 41.5 टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर 5 लाखांपेक्षा जास्त आयकर भरणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. 2018-19 च्या तुलनेत, 5 लाख ते 10 लाख रुपयांच्या कर ब्रॅकेटमध्ये 1.10 कोटी करदाते आहेत. देशात श्रीमंतांची संख्या झपाट्याने वाढत असून एक कोटींहून अधिक कमाई करणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

करदात्यांच्या एकूण संख्येत किरकोळ वाढश्रीमंतांची संख्या वाढूनही देशातील एकूण लोकसंख्येच्या तुलनेत कर भरणाऱ्यांची संख्या अजूनही खूपच कमी आहे. सर्व प्रकारचे प्रयत्न करून सरकार जास्तीत जास्त लोकांना कराच्या कक्षेत आणण्याचा प्रयत्न करत आहे. या संख्येत सुधारणा होऊनही अजून एकूण लोकसंख्येपैकी केवळ 6 टक्के लोक कर भरतात. 

महाराष्ट्र प्रथम आणि उत्तर प्रदेश दुसरा2022-23 मध्ये भरलेल्या आयकर रिटर्नची संख्या 7.78 कोटी होती. यावर्षी महाराष्ट्र या यादीत अव्वल स्थानावर आहे, जिथे 1.98 कोटी रिटर्न भरले गेले. उत्तर प्रदेश 75.72 लाखांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. यानंतर गुजरातमध्ये 75.62 लाख आणि राजस्थानमध्ये 50.88 लाख रिटर्न भरले गेले. या यादीत पुढे, पश्चिम बंगालमध्ये 47.93 लाख, तामिळनाडूमध्ये 47.91 लाख, कर्नाटकमध्ये 42.82 लाख आणि दिल्लीत 39.99 लाख आयकर रिटर्न भरले आहेत.

 

टॅग्स :इन्कम टॅक्सव्यवसायगुंतवणूकभारत