ब्रम्हानंद जाधव- मेहकर (बुलडाणा) महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत राज्यात सन २०१४-१५ मध्ये १ लाख ३४ हजार ९६५ कामे पूर्ण झाली आहेत. सध्या १५ हजार ५२५ कामे सूरू असून, या कामांवर १ लाख १६ हजार ८७६ मजुरांची उपस्थिती आहे. रोहयोतून राज्यातील लाखो मजुरांच्या हाताला काम मिळाले असून, त्यांच्या मजुरीतही यावर्षी १३ रुपयांनी वाढ करण्यात आलेली आहे. राज्यात महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियमाची अंमलबजावणी १९७७ पासून सुरू झालेली आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामीण भागातील अंतर्गत रस्ते, पूरनियंत्रण, जलसंधारण व जलसंवर्धन, दुष्काळ प्रतिबंधक, लघुसिंचन, जमिनीच्या विकासाकरीता सिंचनाची कामे, पारंपरिक जलस्त्रोतांचे नूतनीकरण, भूविकास, राजीव गांधी सेवा केंद्र, ग्रामीण पेयजल, ग्रामीण स्वच्छता अभियान आदी कामे केली जातात. २०१३-१४ या वर्षात ७८ हजार ८०७ कामे पूर्ण करण्यात आली होती, तर २०१४-१५ मध्ये सुमारे १९ हजारपेक्षा जास्त ग्रामपंचायत क्षेत्रात या योजनेतंतर्गत कामे करण्यात आली. ११ लाख ६० हजार कुटुंबातील एकूण २१ लाख ५६ हजार मजुरांनी यावर्षात १ लाख ३४ हजार ९६५ कामे पूर्ण केली.२०१४-१५ या वर्षातील एकूण कामांपैकी सर्वात जास्त ग्रामीण स्वच्छता अभियानांतर्गत ८७ हजार २५७ कामे पूर्ण झाली आहेत. त्याचबरोबर जमिनीच्या विकासाकरीता सिंचनाची १६ हजार ३५८, जलसंधारण व जलसंवर्धनाची १३ हजार २१७ कामे, दुष्काळ प्रतिबंधक ७ हजार ६८१, तर ग्रामीण भागातील अंतर्गत रस्त्यांची ३ हजार ११ कामे पूर्ण करण्यात आलेली आहेत. सध्या १५ हजार ५२५ कामे सूरू असून, या कामांवर १ लाख १६ हजार ८७६ मजुरांची उपस्थिती आहे. रोजगार हमी योजनेच्या कामावरील मजुरांसाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा २००५ मधील कलम ६ नुसार प्रत्येक वर्षी मजुरी दर निश्चित करण्यात येतात. २०१४-१५ मध्ये मजुरीचा दर १६८ रुपये होता. यावर्षी २०१५-१६ मध्ये १८१ रुपये दर ठेवण्यात आला आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत काम करणाऱ्या मजुरांची मजुरी त्यांच्या बँक किंवा पोस्ट खात्यामध्ये जमा केली जाते. २०१३-१४ अखेरपर्यंत ४६ लाख ७० हजार, तर सन २०१४-१५ या वर्षअखेरपर्यंत ४७ लाख ५६ हजार मजुरांची खाती उघडण्यात आली.
रोहयोतून लाखो मजुरांच्या हाताला मिळाले काम!
By admin | Published: October 02, 2015 11:20 PM