प्रसाद गो. जोशी
अतिशय दोलायमान अवस्थेतील गत सप्ताहामध्येही बाजाराला मोठ्या विक्रीमुळे तोटा सहन करावा लागला आहे. आगामी सप्ताहामध्ये बाजाराची वाटचाल ही मुख्यत: खनिज तेलाचे दर, रशिया-युक्रेनदरम्यानचा तणाव यामुळे जगभरातील शेअर बाजारांमध्ये होणाऱ्या बदलांवरच ठरणारी आहे. बाजाराला दिशा दाखविणाऱ्या काही देशांतर्गत घडामोडि अपेक्षित नसल्याने बाजार काही प्रमाणात स्थिर राहण्याची अपेक्षा आहे.
विविध कंपन्यांचे तिमाही निकाल जाहीर होणे संपले आहे. त्यामुळे बाजाराला आता त्यामधून काही दिशा मिळणारी नाही. गत सप्ताहामध्ये जाहीर झालेली महागाईची आकडेवारी बाजाराची चिंता वाढविणारी आहे. मात्र रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेली आशादायक वाढ ही सकारात्मक बाब आहे. जगातील जवळपास सर्वच देशांना महागाईने ग्रासले असले तरी भारतात त्याच्या झळा कमी बसण्याची शक्यता आजतरी आहे.
बाजारातून पैसे काढून घेण्याचे प्रमाण वाढले
परकीय वित्तसंस्थांनी भारतीय बाजारामधून भांडवल काढून घेणे सुरूच ठेवले आहे. चालू महिन्यात आतापर्यंत १८,८५६ कोटी रुपये काढून घेतले आहेत. यापैकी १५,३४२ कोटी रुपये हे समभागांमधून काढून घेतले आहेत, हे विशेष. सलग पाचव्या महिन्यामध्ये परकीय वित्तसंस्थांनी पैसे काढून घेतले आहेत. गेल्या वर्षभरामध्ये या संस्थांनी भारतामधून ८ अब्ज डॉलरची रक्कम काढून घेतली आहे.
गत सप्ताहामध्येही बाजार खाली आल्याने बाजार भांडवलमूल्य ३,४१,७६३.७९ कोटी रुपयांनी कमी झाले. त्यामुळे गुंतवणूकदारांचा तोटा झाला आहे. बाजारातील पहिल्या दहा कंपन्यांपैकी पाच कंपन्यांचे भांडवल गत सप्ताहात वाढले, तर पाच कंपन्यांचे कमी झाले आहे. सर्वाधिक वाढ टीसीएसमध्ये झाली. रिलायन्स, हिंदुस्तान युनिलिव्हर, एचडीएफसी आणि बजार फायनान्समध्येही वाढ झाली. त्याच वेळेला एचडीएफसी बँक, इन्फोसिस, आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक आणि भारती एअरटेल यांना फटका बसला आहे.