नवी दिल्ली : बचत खाते सुरू ठेवण्यासाठी आवश्यक खात्यावर ठेवणे असलेल्या किमान रकमेत स्टेट बँक आॅफ इंडियाने (एसबीआय) कैक पटीने वाढ केली आहे. किमान रक्कम खात्यावर नसल्यास २0 रुपये ते १00 रुपये या दरम्यान दंड लावण्यात येणार आहे. १ एप्रिलपासून हा निर्णय आमलात येणार असून लाखो पेन्शनर्स अणि विद्यार्थ्यांसह ३१ कोटी खातेधारकांना त्याचा फटका बसणार आहे. किमान जमा रकमेस बँकांच्या भाषेत मासिक सरासरी जमा (एमएबी) असे म्हटले जाते. एसबीआयबरोबरच तिच्या पाच सहयोगी बँकांसाठीही एमएबी वाढविण्यात आले आहे. सध्या चेकबुक नसेल तर ५00 रुपये आणि चेकबुक असेल तर १ हजार रुपये किमान ठेव बँकेत असणे आवश्यक आहे. हा नियम सर्व शहरांसाठी सारखाच आहे. १ एप्रिलपासून शहरांच्या आकारानुसार यासंबंधीचे नियम वेगवेगळे असतील. महानगरे (मेट्रो सिटी), शहरी, निमशहरी भाग आणि ग्रामीण भाग असे चार प्रकारांत बँक शाखांचे वर्गीकरण करण्यात आले आहे. महानगर या व्याख्येत दिल्ली-मुंबईसह देशातील सहा मोठी शहरे येतात. येथील एसबीआयच्या शाखांतील खात्यावर आता किमान ५ हजार रुपये ठेवणे आवश्यक असेल. त्यापेक्षा कमी रक्कम असल्यास ५0 ते १00 रुपये दंड आकारला जाईल. शहरी आणि निमशहरी भागांतील शाखांतील खात्यांवर अनुक्रमे ३ हजार रुपये आणि २ हजार रुपये असणे आवश्यक आहे. ग्रामीण भागांतील बचत खात्यांवर किमान १ हजार रुपये असणे आवश्यक असून त्यापेक्षा कमी रक्कम असल्यास २0 ते ५0 रुपये दंड लागेल. पाच वर्षांनंतर दंडाचे पुनरुज्जीवन करण्यात आले आहे.निर्णयाचा फेरविचार करा : सरकारचे आवाहनकिमान जमा रकमेच्या अभावी दंड आकारण्याच्या निर्णयाचा फेरविचार करण्यात यावा, असे आवाहन केंद्र सरकारने एसबीआयला केले आहे. सूत्रांनी सांगितले की, १ एप्रिलपासुन आमलात येणाऱ्या या निर्णयाचा फेरविचार करा, असे सरकारने एसबीआयला सांगितले आहे. विशिष्ट मर्यादेनंतर एटीएम विड्रॉलवर शुल्क लावण्याच्या निर्णयाचाही फेरविचार करण्याचे आवाहन सरकारने केले आहे.
स्टेट बँकेच्या खातेदारांवर ‘किमान जमा’चे बंधन
By admin | Published: March 07, 2017 3:51 AM