Piyush Goyal On Startups: सध्या बाजारात ई कॉमर्स कंपन्यांची चलती आहे. लाखो लोकांना या कंपन्यांनी रोजगार दिला आहे. हे चांगले की वाईट यावर कोणी विचार केलेला नाही. कारण या नोकरीत महिन्याकाठी २० ते २५ हजार रुपये या डिलिव्हरी बॉयना सुटत आहेत. परंतु, वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी या प्रकारच्या नोकरी देण्यावर आक्षेप नोंदवलाय. त्यांच्या म्हणण्यानुसार हे डिलिव्हरी अॅप बेरोजगार गरीबांना श्रीमंतांचे डिलिव्हरी एजंट बनवत आहेत.
गोयल यांनी चीनच्या स्टार्टअप सिस्टीमशी तुलना करताना म्हटलं की, भारतात आम्ही डिलिव्हरी अॅप्स बनवले आहेत, जे खूप वेगानं लोकांपर्यंत वस्तू पोहोचवत आहेत. ही आपली परिस्थिती आहे, तर चीन आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर काम करत आहे आणि ते इलेक्ट्रिक वाहनांवरही वेगानं काम करत आहेत. स्टार्टअपच्या जगातूनही प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी सांगितले. मात्र यानंतर झेप्टोच्या सीईओंनी भारतीय स्टार्टअप्सचा बचाव करत मोठं वक्तव्य केलं. आम्ही दीड लाख नोकऱ्या निर्माण केल्या आहेत आणि सरकारला दरवर्षी १००० कोटी रुपयांचा कर भरतो, असं ते म्हणाले.
बेरोजगार गरीबांना श्रीमंतांचे डिलिव्हरी एजंट बनविले जातेय; डिलिव्हरी अॅपवर पीयूष गोयल यांची टीका
काय म्हणाले आदित पालिचा?
झेप्टोचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित पलिचा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट शेअर केली. "भारतात कन्झुमर इंटरनेट स्टार्टअपवर टीका करणं सोपं आहे. जेव्हा आपण त्यांची तुलना चीन आणि अमेरिकेच्या नेत्रदीपक तांत्रिक प्रगतीशी करता तेव्हा हे सर्व घडतं. आपलंच उदाहरण घ्यायचं झाले तर आम्ही झेप्टोच्या माध्यमातून दीड लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. हे एका कंपनीनं केलंय जी ३.५ वर्षांपूर्वी अस्तित्वातही नव्हती. आम्ही दरवर्षी एक हजार कोटी रुपयांचा कर भरतो. अब्जावधी डॉलर्सचा एफडीआय भारतात आला असून सप्लाय चेन मजबूत करण्यासाठी सातत्यानं गुंतवणूक केली जात आहे. भारताच्या इनोव्हेशनच्या जगतात हे एखाद्या जादू प्रमाणे नाही तर काय?" असं आदित पलिचा म्हणाले.
आणखी काय म्हणाले पलिचा?
आपण एआय मॉडेलवर मोठ्या प्रमाणावर काम का करू शकत नाही, असा सवालही त्यांनी केला. कारण आपण मोठ्या इंटरनेट कंपन्या तयार केल्या नाहीत. बहुतांश तांत्रिक बाबी कन्झुमर इंटरनेट कंपन्यांनी आणल्या आहेत. गेल्या दोन दशकांची ही कहाणी आहे. आज अॅमेझॉन, अलिबाबा, फेसबुक, गुगल, टेनसेंट अशा मोठ्या इंटरनेट आहेत. या कंपन्या प्रामुख्यानं कन्झ्युमर इंटरनेट कंपन्या आहेत. कारण कन्झ्युमर इंटरनेट कंपन्यांकडे मोठा डेटा आहे. जर आपण देशांतर्गत बाजारपेठेत कोट्यवधी डॉलर्स कमवणार आहोत आणि यशस्वी होत राहिलो तर आम्ही एक मोठा तांत्रिक बदल घडवून आणू, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.