Join us

पीएफवरील व्याजदरात वाढ होणार का? केंद्रीय मंत्र्यांनी संसदेत दिली मोठी माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2022 4:07 PM

PF : कामगार आणि रोजगार राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही मोठी माहिती दिली आहे.

नवी दिल्ली : पीएफ खातेधारकांसाठी एक मोठी बातमी आहे. पीएफ खात्यावरील व्याजदरात वाढ करण्याबाबत सरकारने मोठे विधान केले आहे. कामगार आणि रोजगार राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी 2021-2022 या आर्थिक वर्षासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) ठेवींवरील व्याजदरात कोणताही बदल होणार नसल्याचे सभागृहात सांगितले. कामगार आणि रोजगार राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही मोठी माहिती दिली आहे.

दरम्यान, हा प्रश्न सभागृहात कामगार आणि रोजगार राज्यमंत्री रामेश्वर तेली यांना विचारण्यात आला होता की, कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या ठेवीवरील व्याजदर वाढविण्याचा सरकार फेरविचार करत आहे का? यावर लेखी उत्तर देताना त्यांनी स्पष्ट केले की, व्याजदराचा पुनर्विचार करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही. म्हणजे पीएफ खात्यावरील व्याजदरात कोणतीही वाढ होणार नाही.

कामगार आणि रोजगार राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी हेही सांगितले की, ईपीएफचा व्याजदर हा सामान्य भविष्य निर्वाह निधी (7.10 टक्के), ज्येष्ठ नागरिक बचत योजना (7.40 टक्के) आणि सुकन्या समृद्धी खाते योजना (7.60 टक्के) यांसारख्या तुलनात्मक योजनांपेक्षा जास्त आहे. म्हणजेच, रामेश्वर तेली यांच्या मते, लहान बचत योजनांमधून पीएफवर मिळणारे व्याज अजूनही जास्त आहे, अशा परिस्थितीत पात्र सरकार व्याजदर वाढीचा विचार करणार नाही. ईपीएफवर 8.10 टक्के व्याज देण्यास मान्यता देण्यात आली आहे.

'8.10 दराने व्याज मिळणार' याचबरोबर, पीएफवरील व्याजदर हा ईपीएफद्वारे आपल्या गुंतवणुकीतून मिळालेल्या उत्पन्नावर अवलंबून असतो आणि असे उत्पन्न केवळ ईपीएफ योजना, 1952 नुसार वितरित केले जाते, असे कामगार आणि रोजगार राज्यमंत्री रामेश्वर तेली म्हणाले. तसेच, सीबीटी आणि ईपीएफने 2021-22 साठी 8.10 टक्के व्याजदराची शिफारस करण्यात आली होती, ज्याला सरकारने मान्यता दिली आहे, म्हणजेच यावेळी पीएफवर 8.10 दराने व्याज मिळणार आहे, असेही कामगार आणि रोजगार राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी सांगितले.

टॅग्स :व्यवसायपैसाभविष्य निर्वाह निधी