Join us

टीसीएसचे समभाग विकून २0 हजार कोटी उभारण्याची संधी मिस्त्री यांनी गमावली

By admin | Published: November 08, 2016 3:27 AM

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमधील (टीसीएस) ५ टक्के समभाग विकून २0 हजार कोटी रुपये उभे करण्याचा सल्ला टाटा सन्सवर नियंत्रण असलेल्या टाटा ट्रस्टने दिला होता

मुंबई : टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमधील (टीसीएस) ५ टक्के समभाग विकून २0 हजार कोटी रुपये उभे करण्याचा सल्ला टाटा सन्सवर नियंत्रण असलेल्या टाटा ट्रस्टने दिला होता. तथापि, सायरस मिस्त्री यांनी त्याकडे दुर्लक्ष करून ही संधी गमावली. टाटा उद्योग समूहातील उच्चस्तरीय सूत्रांनी ही माहिती दिली.टाटा ट्रस्टचा सल्ला धुडकावल्यामुळे मिस्त्री यांच्यावरील ट्रस्टचा विश्वास घटला होता. त्यातून २४ आॅक्टोबर रोजी मिस्त्री यांची टाटा सन्सच्या चेअरमनपदावरून हकालपट्टी झाली, असेही सूत्रांनी सांगितले.मोठ्या प्रमाणात डिव्हिडंड द्यावा लागत असल्यामुळे टाटा उद्योग समूहाची आर्थिक स्थिती कठीण बनत चालली होती. त्यावर मात करण्यासाठी टीसीएसमधील भांडवलाचे रोखीकरण करणे हा चांगला मार्ग आहे, असे ट्रस्ट्सना वाटत होते. आॅक्टोबर २0१४ मध्ये टीसीएसच्या समभागाचे मूल्यही सार्वकालिक उच्चांकावर होते. टीसीएसमध्ये टाटा सन्सचे ७४ टक्के समभाग आहेत. त्यातील ५ टक्के भागभांडवल विकले असते तर कंपनीला ३ अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे २0 हजार कोटी रुपये मिळाले असते. टाटावर २५ अब्ज डॉलरचे कर्ज आहे. त्यामुळे काही मोठ्या प्रकल्पांसाठी भांडवल पुरविणे अशक्य होत होते. समभाग विक्रीतून मिळालेला निधी त्यासाठी वापरता आला असता, असे सूत्रांनी म्हटले.सायरस मिस्त्री यांच्या गटातून मात्र हा युक्तीवाद फेटाळण्यात आला. रतन टाटा यांच्या कार्यकाळातही टीसीएसमधील भागभांडवल विकण्याचा निर्णय टाळण्यात आला होता, असा दावा मिस्त्री यांच्या वतीने करण्यात आला. सूत्रांनी सांगितले की, टीसीएसमध्ये टाटा सन्सचे तब्बल ३२ अब्ज डॉलरचे भागभांडवल आहे. टाटा सन्ससाठी हे भागभांडवल लाईफलाईन ठरू शकते. (प्रतिनिधी)