नवी दिल्ली : पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिसळल्यास देशाच्या आर्थिक उलाढालीमध्ये दरवर्षी सुमारे 1 लाख कोटी रुपयांचा फायदा होईल. यामुळे फॉरेक्स एक्सचेंजची बचत करण्यास सुद्धा मदत होईल. केंद्रीय पेट्रोलियम सचिव तरुण कपूर यांनी रेपोस एनर्जी आणि टाटा मोटर्सच्या कार्यक्रमात बोलताना ही माहिती दिली.
सध्या देशात विकल्या जाणाऱ्या पेट्रोलमध्ये फक्त पाच टक्के इथेनॉल मिसळले जाते. या जैवइंधनाला (बायो-इंधन) अनेक स्त्रोतांतून तयार केले गेले आहे. "आम्ही कॅलक्युलेशन केले आहे. यामुळे असे समजते की, पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिसळल्यामुळे आणि 5,000 कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्लांट्स बसविल्यामुळे देशात दरवर्षी एक लाख कोटींची आर्थिक उलाढाल होऊ शकते," असे तरूण कपूर यांनी सांगितले.
याचबरोबर, जगातील अनेक देश आता जीवाश्म इंधनांपासून उर्जेच्या नवीन स्त्रोतांकडे पाहात आहेत. भारतात परिवर्तनाचा एक टप्पा सुरू झाला आहे. मात्र, देशात उर्जेची मोठी गरज आहे. आपण कोळसा ते तेल आणि वायूकडे जात आहोत. जर भारतालाही नूतनीकरण आणि गॅसच्या दिशेने वाटचाल करायची असेल तर आपण देशामध्ये काय उत्पादन करता येईल ते पहावे लागेल. इथेच बायो-इंधन आणि सौर उर्जा महत्त्वपूर्ण असल्याचे सिद्ध होऊ शकते, असेही तरुण कपूर म्हणाले.
या बदलत्या काळात बायो-इंधनाचा अवलंब केल्याने मोठ्या प्रमाणात फॉरेक्स एक्सचेंज वाचू शकते, उद्योजकांची संख्या वाढू शकते आणि मोठ्या संख्येने नोकऱ्या मिळू शकतात. तसेच, आम्ही बायो-इंधनावर अवलंबून असलेली अर्थव्यवस्था बनू शकतो. स्टार्टअप्सनी या संधीसाठी पैसे कमविण्याचे आवाहनही तरूण कपूर यांनी केले.
मॅन्युफॅक्चरिंगच्या दृष्टिकोनातून सुद्धा स्टार्टअप्ससाठी मोठ्या संधी उपलब्ध आहेत. कपूर म्हणाले की तेल आणि गॅस क्षेत्रातील सरकारी कंपन्या केवळ कॅपेक्सच्या नावावर दीड लाख कोटी रुपये खर्च करतात. उपकरणे मोठ्या प्रमाणात आयात करावी लागतात. जर आपण खाजगी क्षेत्राचा कॅपेक्स जोडला तर ते वार्षिक सुमारे 2 लाख कोटी रुपये होते, असेही तरूण कपूर यांनी सांगितले.