नवी दिल्ली : बहुराष्ट्रीय कंपन्यांचे (एमएनसी) फंड हे थीमॅटिक श्रेणीत येतात. यात एमएनसीच्या समभागांत गुंतवणूकदारांचे पैसे लागतात. अलीकडे यांचा परतावा आकर्षक राहिलेला नाही. तथापि, दीर्घ कालावधीसाठी हे फंड उत्तम परतावा देतात, असे दिसून आले आहे. १० वर्षांच्या कालावधीत त्यांनी ‘निफ्टी ५० टोटल रिटर्न इंडेक्सला’ही मागे सोडले आहे.
एसबीआय म्युच्युअल फंड, यूटीआय, आदित्य बिर्ला सन लाइफ व आयसीआयसीआय प्रूडेंशियल या कंपन्या एमएनसी श्रेणीत ॲक्टिव फंड उपलब्ध करून देतात. कोटक निफ्टी एमएनसी इंडेक्सवर आधारित ईटीएफ उपलब्ध करून देते. म्युच्युअल फंड कंपन्या एमएनसी फंड श्रेणीत १२,३१५ कोटींच्या मालमत्ता व्यवस्थापित करतात.
या गाेष्टी ठेवा लक्षात
वैविध्यपूर्ण पोर्टफोलियो : एमएनसी फंड ५०%पेक्षा अधिक विदेशी प्रवर्तकांची हिस्सेदारी असलेल्या कंपन्यांत गुंतवणूक करतात. यांचा व्यवसाय एफएमसीजी, ऑटोमोबाइल, हेल्थकेअर, मेटल, मायनिंग, आयटी अशा वैविध्यपूर्ण क्षेत्रात आहे.
आकर्षक परतावा : ज्या बहुराष्ट्रीय कंपन्या आउटसोर्सिंगसाठी आतापर्यंत चीनवर अवलंबून होत्या, त्या आता भारतात स्थलांतरित होत आहेत. त्यामुळे दीर्घ अवधीत हे फंड आकर्षक परतावा देऊ शकतात.
दर्जेदार गुंतवणूक : एमएनसी फंड हे दर्जेदार गुंतवणूक मानले जातात. कारण ते जागतिक पातळीवरील मान्यवर कंपन्यांतच गुंतवणूक करतात. हे फंड अधिक स्थिर असतात.
कोणी करावी गुंतवणूक? : ३ ते ५ वर्षांसाठी ‘इक्विटी फंडा’त गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांसाठी एमएनसी फंड उत्तम पर्याय आहेत. अधिक जोखीम घेण्याची इच्छा नसलेल्यांसाठीही हा चांगला पर्याय आहे.
काय काळजी घ्यावी : ‘इक्विटी पोर्टफोलियो’मध्ये थीमॅटिक फंडांची हिस्सेदारी २० टक्क्यांवरच मर्यादित ठेवायला हवी. तसेच एमएनसी फंडाची हिस्सेदारी १० टक्क्यांपेक्षा अधिक नसावी.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"