नवी दिल्ली : भारतात मंदी असली तरी बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या कामगिरीवर कोणताही परिणाम झालेला नाही. उलट युरोपसह जगातील इतर देशांच्या तुलनेत भारताने जबरदस्त व्यवसाय दिल्याने या कंपन्यांची चांदी झाली आहे. ग्राहकोपयोगी वस्तूंची विक्री घटली असली तरीही भारत हा हिंदुस्तान युनिलिव्हर आणि नेस्टले यासारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यांसाठी आजही पैशाची खाणच आहे.
युनिलिव्हर आणि नेस्टले यासारख्या विदेशी कंपन्या असोत की पार्ले आणि ब्रिटानिया यासारख्या स्वदेशी कंपन्या, कोणीही मंदी नाकारलेली नाही. तथापि, भारतातील कामगिरीमुळे विदेशी कंपन्यांची एकूण कामगिरी उंचावल्याचे चित्रही समोर आले आहे. युनिलिव्हरने जानेवारीमध्ये वार्षिक अहवाल जारी करताना म्हटले की, भारतातील वृद्धीमुळे आमची यंदाची कामगिरी सुधारली आहे.
भारतात आम्ही लव्ह अँड केअर हा डिटर्जंट ब्रँडही जारी केला आहे. स्विडिश एफएमसीजी कंपनी ‘नेस्टले एसए’ने म्हटले की, भारतातील चांगल्या कामगिरीमुळे आमची दक्षिण आशियातील कामगिरी उंचावण्यास मदत झाली आहे.
‘किअर्नी’च्या कंझ्युमर अँड रिटेल इंडस्ट्रिज शाखेचे भागीदार सुभेंदू रॉय यांनी सांगितले की, जगात बहुतांश सर्वच ठिकाणच्या तुलनेत भारतातील व्यावसायिक वृद्धी दुप्पट राहिली आहे. युरोपसह इतर देशांत सुमारे २ ते ३ टक्के वृद्धी असताना भारतातील वृद्धी ५ ते १० टक्के आहे. भारत हा आकार आणि वृद्धीच्या दृष्टीनेही जगातील पहिल्या पाच बाजारांत समाविष्ट आहे.
‘केपीएमजी’च्या कंझ्युमर मार्केट अँड इंटरेनट बिझनेस विभागाचे भागीदार आणि प्रमुख हर्ष राजदान यांनी सांगितले की, ग्रामीण भारत यापुढील वृद्धीचा प्रमुख चालक ठरत आहे. डिजिटल साक्षरता आणि जागृती वाढल्यामुळे ग्रामीण बाजार उपभोगाच्या बाबतीत स्पर्धेत आघाडीवर आला आहे.
या क्षेत्रातील जाणकारांनीही भारतातील व्यवसायाबद्दल प्रशंसोद्गार काढले आहेत. ‘ईवाय’च्या कंझ्युमर प्रॉडक्ट्स अँड रिटेल शाखेचे भागीदार व राष्ट्रीय प्रमुख पिनाकीराजन मिश्रा यांनी सांगितले की, भारतात मंदी असली तरी व्यवसाय चांगला आहे. जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतीय बाजारात बहुराष्ट्रीय कंपन्यांची कामगिरी चांगली राहिली आहे.
मंदी असतानाही भारतात बहुराष्ट्रीय कंपन्यांची झाली चांदी
युनिलिव्हर आणि नेस्टले यासारख्या विदेशी कंपन्या असोत की पार्ले आणि ब्रिटानिया यासारख्या स्वदेशी कंपन्या, कोणीही मंदी नाकारलेली नाही. तथापि, भारतातील कामगिरीमुळे विदेशी कंपन्यांची एकूण कामगिरी उंचावल्याचे चित्रही समोर आले आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2020 02:24 AM2020-02-23T02:24:25+5:302020-02-23T06:49:26+5:30