मुंबई - कोरोना काळात माणसाला डिजिटल माध्यमांशिवाय पर्याय नव्हता. तर, आता लहान मुलांच्याही हाती स्मार्टफोन आले आहेत. त्यामुळे, सर्वकाही डिजिटल होताना दिसत असून ऑनलाईन शॉपिंग साईटचीही क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच, नवरात्री उत्सवाच्या मुहूर्तावर फ्लिपकार्ट आणि अमेझॉनसारख्या शॉपिंग साईट्सने ऑनलाईन खरेदीवर मोठ्या ऑफर सुरू केल्या आहेत. इंग्रजी, हिंदी आणि दक्षिणेतील काही भाषांसह हे अॅप भारतात काम करतात. पण, या अॅपसाठी मराठी भाषेचा वापर होत नसल्याने मनसेनं आक्रम पवित्रा घेतला आहे.
जिथं मराठीला डावललं जातं, तिथं मनसेचं आगमन होतं, असं जणू समिकरणच बनलंय. त्यामुळेच, राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता आपला मोर्चा अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स कंपन्यांकडे वळवला आहे. अॅमेझॉन, फ्लिपकार्ट यांनी येत्या सात दिवसांत त्यांचं अॅप मराठी भाषेत सुरू करावं, अन्यथा त्यांची दिवाळी मनसे स्टाईलने होईल, असा इशा मनसेचे नेते अखिल चित्रे यांनी दिला आहे. ''अमेझॉन व फ्लिकार्ट ह्या बॅंगलळुरू स्थित कंपन्यांची दक्षिणी भाषांना प्राधान्य देत महाराष्ट्रात मराठी भाषेला डावलले आहे. तरी, आज @Flipkart @amazonIN ह्या कंपनी व्यवस्थापनाला त्यांच्या मुख्य कार्यालयात जाऊन @mnsadhikrut दणका दिला.'', असं ट्विट अखिल चित्रे यांनी केलंय.
महाराष्ट्रात गेल्या 5 ते 6 वर्षांपासून या कंपन्या कार्यरत आहेत. इंग्रजी, हिंदी या भाषेतून कंपनीतर्फे ग्राहकांसोबत व्यवहार केले जातात. विशेष म्हणजे दक्षिण भारतातील तमिळ, तेलुगू या भाषांमध्येही हे अॅप कार्यरत आहेत. मात्र, मराठी भाषेत हे अॅप कार्यरत नसल्याने मनसेनं नाराजी व्यक्त केली आहे.
ॲमेझॉन (AMAZON) कंपनीला महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा डावलल्याबद्दल समज दिली. तसेच यापुढे ॲमेझॉन (AMAZON) कंपनीला महाराष्ट्रामध्ये काम करायचे असेल तर मराठी भाषेचा सन्मान केलाच पाहिजे अशी ताकीद सुध्दा दिली. जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये राज साहेब ठाकरे आहेत, तोपर्यंत मराठी भाषेचा अपमान करणाऱ्या कुठल्याही कंपनीला सोडणार नाही, असे मनसेचे संयुक्त सरचिटणीस सचिन यशवंत गोळे यांनी म्हटले आहे. गोळे यांनी अमेझॉनच्या कार्यालयात जाऊन कंपनीतील अधिकाऱ्यांना माफी मागण्यासही भाग पाडले. मराठी भाषेचा वापर न केल्यामुळे अगोदर माफी मागा अन्यथा मनसेस्टाईल दाखवू असा इशाराच मनसेनं दिला होता. त्यानंतर, या कंपनीतील अधिकाऱ्यांनी माफी मागितली आहे. तसेच, लवकरच वरिष्ठांशी बोलून मराठी भाषेतही कंपनीकडून व्यवहार करण्यास सुरूवात होईल, असे आश्वासनही देण्यात आले आहे.