Join us  

मोबाईल हरवलाय, नावावर किती सिमकार्ड आहेत? सर्व माहिती एकाच ठिकाणी, सुरू झालं 'संचार साथी'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2023 7:39 PM

चोरी झालेल्या मोबाईलच्या माहितीपासून अनेक माहिती तुम्हाला सरकारच्या Sanchar Saathi Portal वर मिळणार आहे.

केंद्र सरकारनं संचार साथी पोर्टलची सुरूवात केली आहे. दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते हे पोर्टल लाँच करण्यात आलं. या पोर्टलद्वारे चोरीला गेलेले मोबाईल ऑनलाइन ट्रॅक करता येतात. यासोबतच तुमच्या मोबाईल नंबरवर किती सिम नोंदणीकृत आहेत याची माहिती तुम्हाला मिळू शकेल. जर तुम्हाला वाटत असेल की तो नंबर फ्रॉड आहे, तर तुम्ही तो नंबर ब्लॉकही करू शकता. संचार साथी पोर्टल देशभरात उपलब्ध करून देण्यात आलंय. आता कोणालाही या पोर्टलद्वारे माहिती मिळवता येईल.

चोरीला गेलेला मोबाईल ट्रॅक करण्यासाठी IMEI नंबर आवश्यक असेल, ज्यामुळे तुमचा चोरीला गेलेला मोबाईल ट्रॅक आणि ब्लॉक करण्यात मदत होईल. मात्र, चोरीला गेलेला मोबाईल ट्रॅक करण्यासाठी तुम्हाला मोबाईलचा IMEI नंबर सांगावा लागेल. हा एक 15 अंकी युनिक नंबर असतो. या प्रकरणात, मोबाइल नेटवर्क प्रोव्हायडरकडे तुमच्या मोबाइलच्या IMEI क्रमांकापर्यंत पोहोच असेल. जर कोणी विना रजिस्टर्ड मोबाईलवरून कॉल केल्यास, त्याची ओळख पटेल.

फसवणुकीच्या प्रकरणात वाढ

मोबाइलद्वारे फसवणूक आणि सिम कार्डाशी निगडीत फसवणुकीच्या घटनांमघ्ये वाढ झाली आहे. बनावट सिम आणि मोबाइल देशाच्या सुरक्षेसाठी धोका ठरू शकतात. ऑनलाइन फ्रॉड सारख्या घटनांमध्येही याचा वापर होत होता. यापासून बचाव करण्यासाठी सरकारनं संचार साथी पोर्टल लाँच केलंय. तर दुसरीकडे मोबाईल फोनची चोरी रोखण्यासाठीही हे पोर्टल मदत करेल. यापूर्वी पायलट प्रोजेक्ट म्हणून काही शहरांमध्ये हे सुरू करण्यात आलं होतं. परंतु आता देशभरात याची सुरूवात करण्यात आली आहे. 

टॅग्स :स्मार्टफोनसरकार