ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 22 - जिओ मोबाइल सेवा मोफत देण्याची घोषणा करून दूरसंचार क्षेत्राला धक्का देणा-या रिलायन्सने आता नवा धमाका केला असून, सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल असा ४जी फोन बाजारात आणला आहे. या फोनवर ४जी इंटरनेट चालेल तसेच व्हॉइस कॉल सेवा मोफत मिळणार आहे. रिलायन्सच्या या निर्णयामुळे टेलिकॉम मार्केटमध्ये खळबळ माजली आहे. तज्ञांच्या माहितीनुसार, रिलायन्सच्या या स्वस्त सेवेचा सर्वात जास्त फटका भारतीय फिचरफोन निर्माते मायक्रोमॅक्स, इन्टेक्स, लावा आणि कार्बनसोबत मार्केटमधील अग्रेसर कंपनी सॅमसंगला बसणार आहे. रिलायन्ससोबत प्रतिस्पर्धा करण्यासाठी मोठ्या कंपन्यादेखील अशा प्रकारच्या ऑफर्स देण्यासाठी हतबल होऊ शकतात. मिळालेल्या माहितीनुसार, काही कंपन्यांनी स्वस्त 4G डिव्हाईस आणण्याची तयारीही सुरु केली आहे.
संबंधित बातम्या
जिओने आपला हा फोन ग्राहकांना मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. या फोनसाठी १,५00 रुपयांचे डिपॉजिट कंपनी घेणार आहे. ३६ महिन्यानंतर फोन परत करून हे डिपॉझिट ग्राहकास परत घेता येईल. रिलायन्सच्या या प्लानमुळे होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी दुस-या कंपन्या अशाच प्रकारची ऑफर आणावी लागणार असल्याचं मत तज्ञांनी व्यक्त केलं आहे.
अनेक मोबाईल कंपन्यांनी सर्वात कमी किंमतीचा 4G मोबाईल आणण्यासाठी काम सुरुदेखील केलं आहे अशी माहिती मिळत आहे. सोबतच आपल्या बेसिक फोनमध्ये फिचर्स वाढवण्यावरही ते भर देत आहेत. टेलिकॉम सर्व्हिस देणा-यांसोबत हातमिळवणी करत जिओचा सामना करण्यासाठी सर्व सज्ज झाले आहेत.
एकीकडे स्मार्टफोन कंपन्यांवर दबाव येईल असं वाटत असताना, दुसरीकडे यामुळे चांगला फायदा होईल असं काही तज्ञांचं मत आहे. जिओच्या या निर्णयामुळे जास्तीत जास्त लोक स्मार्टफोन वापरास सुरुवात करतील. एकदा इंटरनेटशी जोडले गेल्यानंतर चांगला अनुभव मिळावा असा त्यांचा प्रयत्न असेल. यामुळे स्वस्त स्मार्टफोन्सची मागणी वाढेल आणि याचा परिणाम बाजारावर होऊन उलाढाल वाढेल.
गेल्या एक वर्षात स्मार्टफोन्सच्या मागणीत घट झाली असल्याचं समोर आलं आहे. फिचर फोन वापरकर्त्यांना महागडे स्मार्टफोन परवडत नसल्याने अनेकदा ते खरेदी करत नाहीत.
देशातील सर्वात मोठी हॅण्डसेट निर्मात कंपनी मायक्रोमॅक्स इन्फ्रमॅटिक्सचे सह-संस्थापक विकास जैन यांनी सांगितलं आहे की, "हे एक वादळ आहे. यामुळे आर्थिक गणित बदलणार आहे. या फोनमुळे इंडस्ट्रीला नुकसान होणार आहे यामध्ये काही दुमत नाही. पण किती नुकसान होणार आहे याच अंदाज नाही लावू शकत".
रिलायन्सच्या ४0 व्या वार्षिक सर्वसाधारणसभेत ‘जिओ इंटेलिजन्ट’ ४जी फोन लाँच करण्याची अधिकृत रिलायन्स इंडस्ट्रीचे चेअरमन तथा भारतातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी घोषणा केली. या फोनची प्रभावी किंमत (इफेक्टिव्ह प्राईस) शून्य असणार आहे. गेल्या वर्षी अंबानी यांनी रिलायन्स जिओच्या माध्यमातून मोफत ४जी इंटरनेट सेवा सुरू केली होती. त्यानंतर त्यांनी आता मोफत ४जी फोन बाजारात उतरविण्याची घोषणा केली. या फोनवरही १५३ रुपयांत अमर्याद इंटरनेट डाटा ग्राहकांना मिळेल. अंबानी यांनी सांगितले की, हा फिचर असून १५ ऑगस्टपासून त्याच्या चाचण्या सुरू होतील, तर २४ ऑगस्टपासून बुकिंग सुरू होईल.
जिओ स्मार्टफोन हा इतर स्मार्टफोनपेक्षा खूप पावरफूल आहे. जिओ म्युझिक, जिओ सिनेमा, जिओ टीव्ही हे फिचर्स आधीपासून या स्मार्टफोनमध्ये लोड करण्यात आले आहेत. या फोनवर १५३ रुपयांत प्रत्येक महिन्याला फ्री व्हाइससह अनलिमिटेड इंटरनेट मिळणार आहे. जिओ ४जी व्होल्ट फोनची इफेक्टिव्ह किंमत शून्य आहे. या फोनवर व्हॉइस कॉलिंग मोफत मिळणार आहे. जिओ फोन कोणत्याही टीव्हीला जोडता येऊ शकणार आहे.