नवी दिल्ली : मोबाइल फोनच्या रिचार्जसाठी अधिक शुल्क आकारले जात असल्याची टीका सध्या विरोधक आणि सोशल मीडियावर केली जात आहे. मात्र ही टीका केंद्रीय दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी फेटाळली आहे. २०१४ पासून मोबाइल फोनचे दर ९४ टक्क्यांनी कमी झाले असल्याचे त्यांनी माहिती देताना सांगितले.
संसदेत एका पुरवणी प्रश्नाला उत्तर देताना सिंधिया म्हणाले की, देशात २०१४ मध्ये ९० कोटी मोबाइल ग्राहक होते, मात्र आता त्यांची संख्या ११६ कोटी इतकी वाढली आहे. जर आपण इंटरनेटच्या वापराबद्दल बोललो तर २०१४ मध्ये २५ कोटी ग्राहक होते आणि आज ही संख्या ९७.४४ कोटी आहे.
जेव्हा ग्राहकांची संख्या वाढते तेव्हा दरांवर देखरेख ठेवणे आवश्यक आहे. भारतात जगभरात सर्वांत स्वस्त व्हॉइस आणि डेटा शुल्क आहे, असे ते म्हणाले.
रिचार्ज का महागला?
५जी सेवेमुळे शुल्कात १० टक्के वाढ झाली. २२ महिन्यांत ९८ टक्के जिल्हे आणि ८२ टक्के लोकसंख्येला ५जी सेवा मिळण्यास सुरुवात झाली. यासाठी कंपन्यांनी ४.५ लाख कोटी रुपये गुंतवलेत. त्यामुळे यातून परतावा मिळायला हवा, त्यामुळे शुल्कवाढ योग्य असल्याचे त्यांनी म्हटले.
३५ कोटींचा अतिरिक्त बोजा शुल्कवाढीमुळे ११९ कोटी मोबाइलधारकांवर बसला आहे. सरकारने या दरवाढीची दखल घेतली आहे का, असा प्रश्न काँग्रेसच्या सुरजेवाला यांनी विचारला.