खंतिया, पश्चिम बंगाल : आयआयटी खरगपूरमधील संशोधकांच्या गटाने आपल्या परिसरातील शेतजमिनीचे रूपांतर प्रयोगशाळेत केले आहे. या प्रयोगशाळेचा उद्देश हा शेतीमध्ये नव्या तंत्रज्ञानाचा वापर वाढून शेतकऱ्यांना जास्त पीक काढता यावे, असा आहे. आयआयटी खरगपूर संस्थेच्या परिसरापासून दहा किलोमीटरवरील खंतिया गावात शेतकऱ्यांच्या गटाने १४ एकर जमीन दत्तक घेतली आहे. छोट्या छोट्या तुकड्यातील शेतजमीन गेल्या काही वर्षांपासून वापरात नव्हती. संशोधकांचा उत्साह पाहून या शेतकऱ्यांनी आपली जमीन आयआयटीच्या तुकडीला कृषी भूमीमध्ये रूपांतरित करण्यास मान्यता दिली. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये वेगवेगळ्या तुकड्यातील ही शेतजमीन सपाट करून तिच्या नांगरणीचे काम सुरू झाले म्हणजे या सगळ्या जमिनीचा मोठा तुकडा तयार करता येईल.
या प्रकल्पाचे प्रमुख प्रो. बी.एस. भदौरिया यांनी सांगितले की, आम्ही एसआरआयसारखे नवे तंत्रज्ञान तयार केले आहे. याद्वारे कमी पाण्यावर तांदळाचे जास्त पीक घेता येईल. पिकांमध्ये विविधता आणण्यासाठी भुईमुगाच्या शेंगा, मका व सोयाबीनसारखी रोखीची पिके सादर करण्यात आली. आयआयटीने कूपनलिका खोदली व पावसाचे पाणी साठवून मत्स्यपालनासाठी तलावही तयार केला. २० गुंठ्यांपेक्षाही कमी शेतजमिनीचे मालक जगन्नाथ दास म्हणाले की, शेतीच्या नव्या नव्या गोष्टी मी शिकतो आहे. आयआयटीसारख्या मोठ्या संस्थेवर आमचा विश्वास असल्यामुळे आम्ही आमच्या जमिनीची जबाबदारी त्यांच्यावर सोपविली आहे. आयआयटी मद्रासमध्ये धातू विज्ञानाचा अभ्यास करणारा युवा वैज्ञानिक अभिषेक सिंघानिया बहुराष्ट्रीय कंपनी प्राईसवॉटर हाऊस कूपर्समध्ये नोकरीला होता; परंतु अभिषेकने या हरित क्रांतीत सहभागी होण्यासाठी सौदी अरेबियातील आपली नोकरी सोडून दिली. आपल्या शेतकऱ्यांची फरपट पाहून त्यांना काही मदत व्हावी या उद्देशाने मी या प्रकल्पात काम करायला लागलो आहे.