Join us  

Share Market : सरकारची मोठी तयारी, डिलिस्ट होऊ शकते MTNL; शेअरच्या किंमतीत मोठी वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2023 8:12 PM

सरकारकडून एमटीएनएल बीएसएनएलच्या मर्जरची प्रक्रिया वेगवान.

दूरसंचार क्षेत्राशी संबंधित एक मोठी बातमी समोर येत आहे. सरकारी मालकीच्या महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (MTNL) आणि भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) च्या विलीनीकरणापूर्वी, सरकार MTNL च्या डिलिस्टिंगशी संबंधित प्रक्रियेची तपासणी करत आहे. दरम्यान, ही माहिती समोर आल्यानंतर एमटीएनएलच्या शेअर्समध्ये चांगलीच तेजी दिसून आली आहे. दिवसभराच्या व्यवहारात कंपनीचे शेअर्स 7 टक्क्यांपर्यंत वर गेले होते. कामकाजाच्या अखेरच्या सत्रात एमटीएनएलचे शेअर 5.53 टक्क्यांनी वाढून 22.90 रुपयांवर बंद झाले.

दूरसंचार विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “कायदेशीर परिणामांचा शोध घेण्यात आला आहे. आम्ही सल्लागार म्हणून एका कंपनीची नियुक्ती केली आहे. पुढील वर्षाच्या अखेरीस MTNL आणि BSNL चे विलीनीकरण पूर्ण होईल अशी आम्हाला आशा आहे, परंतु त्याआधी आम्हाला महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (MTNL) स्टॉक एक्सचेंजमधून डिलिस्ट करावे लागेल.” इकॉनॉमिक टाईम्सने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. महानगर टेलिफोन निगम लिमिटेडच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी 30.50 रुपये आहे. त्याच वेळी, टेलिकॉम कंपनीची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 16.70 रुपये आहे. MTNL चे मार्केट कॅप 1442.7 कोटी रुपये आहे.

बीएसएनएलकडून एमटीएनएलच्या नेटवर्कचा मेंटेनन्सतोट्यात असलेल्या दोन दूरसंचार कंपन्यांचे विलीनीकरण दशकाहून अधिक काळ रखडले आहे. विभाग आता दोन्ही कंपन्यांमधील समन्वय शोधत आहे. तथापि, BSNL आता MTNL चे मोबाईल नेटवर्क दिल्ली आणि मुंबई या दोन कार्यरत महानगरांमध्ये सांभाळत आहे. “सार्वजनिक क्षेत्रातील दोन्ही कंपन्यांच्या पुनरुज्जीवनासाठी विलीनीकरण आवश्यक आहे. ग्राहकांना सुरळीत सेवा देण्यासाठी कंपनीला देशभर काम करावे लागेल. आता BSNL च्या 4G सेवा सुरू होण्यासाठी सज्ज झाल्यामुळे, विलीनीकरणाची प्रक्रिया वेगवान करण्यात आली आहे,” असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

डेलॉइटची नियुक्तीडिलिस्टिंग ही एक मोठी प्रक्रिया आहे आणि आधीच आमच्या बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) सोबत चर्चेच्या काही फेऱ्या झाल्या आहेत. बाह्य सल्लागार कायदेशीर मुद्द्यांवर त्यांचा तपशीलवार अहवाल देतील. तसेच, MTNL डिलिस्टिंग प्रक्रियेवर कसे पुढे जायचे ते स्पष्ट करेल. सरकारी मालकीच्या BSNL ने या प्रक्रियेसाठी डेलॉइटला सल्लागार म्हणून नियुक्त केले असल्याची माहितीही त्यांनी दिली.

टॅग्स :बीएसएनएलव्यवसायशेअर बाजार