नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पाच वर्षांचा सत्ताकाळ युवक, शेतकरी, व्यापारी व लोकशाही यंत्रणा यांच्यासाठी त्रासदायी व विनाशकारी होता. या सरकारने अर्थव्यवस्था धोक्याच्या पातळीवर आणून ठेवली आहे. त्यामुळे मोदींना सत्तेतून घालवायलाच हवे, असे माजी पंतप्रधान व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनमोहनसिंग यांनी म्हटले आहे.एका मुलाखतीत त्यांनी सांगितले की, सध्याचे आर्थिक वृद्धीचे आकडे पाहिले तर मंदीचे संकेत मिळत आहेत. आर्थिक धोरणांमध्ये न्यायालयाचा हस्तक्षेप वाढला आहे. काँग्रेस सरकार अर्थव्यवस्था सुयोग्यरीत्या हाताळत होते. ते आता होत नाही. अर्थखात्याचा सध्याचा मासिक अहवाल पाहिल्यास अर्थव्यवस्था मंदीच्या दिशेने जात असल्याचे स्पष्ट दिसते, असेही डॉ. सिंग यांनी स्पष्ट केले.सत्ताधाऱ्यांकडून रोज जे शब्दांचे खेळ चालतात व रंगरंगोटी केली जाते त्या गोष्टींना जनता कंटाळली आहे. सध्या देशात कुठेही मोदींची लाट नाही. सर्वंकष प्रगती साधण्यावर अजिबात विश्वास नसलेल्या तसेच समाजात अशांतता पसरवून त्यावर राजकीय पोळी भाजून घेण्याची प्रवृत्ती असलेल्या मोदी सरकारला सत्तेतून घालवायचेच हे मतदारांनी मनाशी पक्के ठरविले आहे.मनमोहनसिंग म्हणाले की, पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात ४० सीआरपीएफ जवान शहीद झाले. तेव्हा कॅबिनेटच्या सुरक्षा समितीची तातडीने बैठक बोलावण्याऐवजी मोदी दिवसभर जीम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये स्वत:वरील माहितीपटाचे चित्रीकरण करण्यात मश्गुल होते. पुलवामा हल्ला होणे हे गुप्तचर यंत्रणांचे अपयश होते. त्याचबरोबर दहशतवादाला तोंड देण्यात मोदी सरकार कमी पडत असल्याचेही ते निदर्शक आहे.स्वत:भोवती आरत्या ओवाळणे सुरूनोटाबंदी हा स्वातंत्र्योत्तर भारतातील सर्वात मोठा घोटाळा आहे. या सरकारच्या काळात भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे. मोदींच्या काळात देशाच्या अर्थव्यवस्थेचे प्रचंड नुकसान झाले आहे. सध्या स्वत:भोवती आरत्या ओवाळण्याच्या सुरू असलेल्या प्रकारांना लोक वैतागले आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.
मोदी सरकारने आणली अर्थव्यवस्था धोक्यात, माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2019 4:33 AM