एलआयसी कर्मचाऱ्यांसाठी (LIC Employees) एक आनंदाची बातमी आहे. मोदी सरकारनंएलआयसी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात १७ टक्क्यांची वाढ करण्याला मंजुरी दिली आहे. याचा थेट फायदा सुमारे १ लाख कर्मचारी आणि सुमारे ३०,००० पेन्शनधारकांना होणार आहे. रिपोर्टनुसार, ऑगस्टपासून लागू झालेल्या या वाढीमुळे कंपनीच्या तिजोरीवर ४,००० कोटी रुपयांचा अधिक बोजा वाढणार आहे. कंपनीच्या शेअर्सबद्दल बोलायचं झालं तर १५ मार्च रोजी बीएसईवर एलआयसीचे शेअर्स ३.४ टक्क्यांनी घसरून ९२६ रुपयांवर बंद झाले.
४ टक्के डीए वाढवला
काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारनं सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली होती. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ७ व्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार, या वाढीसह, केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या टेक-होम सॅलरी पॅकेजमध्ये वाढ होण्याची खात्री आहे. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार एचआरए वाढीसाठी शहरांची तीन श्रेणींमध्ये विभागणी करण्यात आली आहे. यामध्ये X, Y आणि Z या श्रेणींचा समावेश आहे.
जर X श्रेणीचा कर्मचारी शहरांमध्ये राहत असेल, तर त्याचा एचआरए ३० टक्क्यांपर्यंत होईल. त्याचप्रमाणे Y श्रेणीसाठी एचआरए दर २० टक्के आणि Z श्रेणीसाठी १० टक्के असेल. सध्या, X, Y आणि Z च्या शहरांमध्ये मध्ये राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना अनुक्रमे २७, १८ आणि ९ टक्के एचआरए मिळतो.
डिसेंबर तिमाही निकाल
डिसेंबर २०२३ (Q3FY24) मध्ये संपलेल्या तिसऱ्या तिमाहीत एलआयसीच्या निव्वळ नफ्यात ४९ टक्क्यांची वाढ होऊन तो ९,४४४ कोटी रुपये झाला. देशातील सर्वात मोठ्या विमा कंपनीला गेल्या वर्षी याच कालावधीत ६,३३४ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. कंपनीचे निव्वळ प्रीमियम उत्पन्न चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत वाढून १,१७,०१७ कोटी झाले, जे मागील वर्षीच्या याच कालावधीत १,११,७८८ कोटी रुपये होते.