Join us  

५ टक्के व्याजावर ₹३ लाखांचं कर्ज देतंय मोदी सरकार, कसा मिळेल फायदा? पटापट चेक करा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2024 3:07 PM

नरेंद्र मोदी सरकारनं आपल्या दुसऱ्या कार्यकाळात अशा अनेक योजना सुरू केल्या, ज्याचा थेट फायदा गरीब कुटुंबांना झाला. अशाच एका योजनेद्वारे सरकार कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देत आहे.

PM Vishwakarma Scheme: नरेंद्र मोदीसरकारनं आपल्या दुसऱ्या कार्यकाळात अशा अनेक योजना सुरू केल्या, ज्याचा थेट फायदा गरीब कुटुंबांना झाला. अशीच एक योजना म्हणजे पीएम विश्वकर्मा योजना. १७ सप्टेंबर २०२३ रोजी पंतप्रधान विश्वकर्मा योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेत आतापर्यंत १३ लाखांहून अधिक लोकांची नोंदणी झाली आहे. चला जाणून घेऊया योजनेचा तपशील.

१८ प्रकारच्या व्यवसायांचा समावेश

या योजनेत स्वत:च्या हातानं आणि अवजारांच्या साहाय्यानं काम करणाऱ्या कारागिरांसह १८ व्यवसायांचा समावेश आहे. सुतारकाम, नौका बांधणारे, शस्त्र निर्माते, लोहारकाम, हातोडा व टूल किट उत्पादक, कुलूप तयार करणारे, सोनार काम, कुंभार काम, शिल्पकार (शिल्पकार, दगडी शिल्पकार), दगड तोडणारे यांचा समावेश आहे. याशिवाय चर्मकार/बूट कारागीर, मिस्त्री, टोपली/चटई/झाडू निर्माते/कॉयर विणकर, बाहुली व खेळणी बनवणारे (पारंपारिक), केशकर्तनकार, हार बनविणारे, कपडे धुणारे, टेलर व मासेमारी जाळी निर्मिती करणारे कारागीर आणि शिल्पकार यांचा समावेश करण्यात आला आहे.

३ लाखांपर्यंतचं कर्ज

पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत ३ लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते. हे कर्ज विनातारण दिलं जातं. १८ महिने आणि ३० महिन्यांच्या कालावधीसाठी अनुक्रमे १ लाख आणि २ लाख रुपयांच्या दोन हप्त्यांमध्ये ५ टक्के निश्चित सवलतीच्या व्याजदरानं हे कर्ज दिलं जात आहे.मूलभूत प्रशिक्षण पूर्ण केलेले लाभार्थी एक लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाच्या मदतीचा पहिला हप्ता घेण्यास पात्र असतील. ज्या लाभार्थ्यांनी पहिला हप्ता घेतला आहे आणि स्टँडर्ड लोन खातं ठेवलं आहे, अशा लाभार्थ्यांना कर्जाचा दुसरा हप्ता मिळू शकतो. याशिवाय आपल्या व्यवसायात डिजिटल व्यवहारांचा अवलंब करणंही बंधनकारक आहे.

कुठे मिळेल अधिक माहिती?

पीएम विश्वकर्मा योजनेची मार्गदर्शक तत्त्वे आणि माहिती pmvishwakarma.gov.in वेबसाइटवरुन जाणून घेऊ शकता. तसंच योजनेशी संबंधित कोणत्याही माहितीसाठी 18002677777 फोनही करू शकता. pm-vishwakarma@dcmsme.gov.in ईमेलद्वारेही माहिती मिळवता येईल.

टॅग्स :पंतप्रधाननरेंद्र मोदीसरकार