Stocks in News: मोदी सरकारच्या मंत्रिमंडळानं शुक्रवारी ३० हजार कोटी रुपयांच्या मेट्रो प्रकल्पांना मंजुरी दिल्यानंतर सोमवारी बीईएमएलचा शेअर (BEML Share) ७ टक्क्यांपर्यंत वधारला. या बातमीनंतर रेल्वेच्या इतर शेअर्समध्येही तेजी दिसून आली आहे. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास इरकॉन १.२२ टक्क्यांनी वधारून २७०.०५ रुपयांवर बंद आला. आरव्हीएनएल १.३२ टक्क्यांनी वधारून ५७८.२० रुपयांवर व्यवहार करत होता. आयआरएफसी, आयसीटीसी, रेलटेल यांसारख्या रेल्वेशी संबंधित अन्य कंपन्यांचे शेअर्सही तेजीसह व्यवहार करत होते.
दुसऱ्या दिवशी तेजी
बीईएमएलचे शेअर्स सलग दुसऱ्या दिवशी तेजीसह व्यवहार करत आहेत. आज हा शेअर ३८५० रुपयांवर खुला झाला आणि ३९८७.७५ रुपयांवर पोहोचला. हा कंपनीच्या शेअरचा उच्चांक होता. कंपनीच्या शेअरचा ५२ आठवड्यांतील उच्चांकी स्तर ५४८८ रुपये आणि नीचांकी स्तर १९०५.०५ रुपये आहे. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास शेअर ४ टक्क्यांनी वधारून ३८८२ रुपयांवर होता.
कोणते आहेत प्रोजेक्ट?
बंगळुरू मेट्रो रेल्वे प्रकल्प टप्पा -३, कॉरिडॉर -१ जेपी नगर फेज ४ ते केंपुरापर्यंत २१ स्थानकं आणि होसहळ्ळी ते कडगेरे या ९ स्थानकांसह कॉरिडॉर २ च्या दोन कॉरिडॉरला सरकारनं प्रथम मंजुरी दिली.
पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यात स्वारगेट ते कात्रज असा सुमारे साडेपाच किलोमीटरचा विस्तार करण्यात आला आहे. या प्रकल्पाची एकूण किंमत सुमारे २,९५४ कोटी रुपये असून २०२९ पर्यंत हा प्रकल्प कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे. एकूण १२ हजार २०० कोटी रुपये खर्चाच्या ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो रेल्वे प्रकल्पालाही मंजुरी देण्यात आली.
बीईएमएलचा मेट्रो प्रकल्पांशी खूप जवळचा संबंध आहे कारण नुकत्याच उद्घाटन झालेल्या मुंबई मेट्रो प्रकल्पासाठी डब्यांचा पुरवठाही बीईएमएलनं केला आहे.
(टीप : यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)