नवी दिल्लीः दसऱ्याच्या मुहूर्तावरच मोदी सरकार प्राप्तिकर करदात्यांना मोठं गिफ्ट देणार आहे. प्राप्तिकर विभागानं करदात्यांसाठी मंगळवारी फेसलेस असेसमेंटची सुरुवात केली आहे. त्यामुळे आता करदात्यांना व्यक्तिगतरीत्या प्राप्तिकर विभागाच्या फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. भारत सरकारचे राजस्व सचिव अजय भूषण पांडेय आणि सीबीडीटी अध्यक्ष प्रमोद चंद्र मोदींनी नॅशनल ई-असेसमेंट सेंटरचं उद्घाटन करताना ही घोषणा केली आहे. 8 ऑक्टोबरपासून प्राप्तिकर विभाग पूर्णतः ऑनलाइन होणार असून, तेव्हापासूनच फेसलेस असेसमेंट सुविधा मिळणार आहे. जीसुद्धा कारवाई होईल ती नॅशनल ई-असेसमेंटद्वारे करता येईल. Faceless-Assessment मुळे लोकांना आता अधिकाऱ्यांसमोर जावं लागणार नाही. त्यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसेल आणि लोकांचा वेळही वाचणार आहे.
करदात्यांच्या तक्रारीमध्ये कमी आणण्यासह व्यवहारात पारदर्शकता आणण्यासाठी मदत मिळणार आहे. नव्या सुविधेसाठी टॅक्सपेयर्सला रजिस्टर्ड ई-मेल आणि वेब पोर्टल www.incometaxindiaefiling.gov.in वर लॉगिन करण्यासह नोटीस आणि सूचना मिळणार आहे. रजिस्टर्ड मोबाइलवर लागलीच मेसेज मिळणार आहे. त्याच आधारावर चौकशी होणार आहे.
तसेच गेल्या काही दिवसांपूर्वी भारतीय प्राप्तिकर विभागाकडून फेक ईमेल लोकांना पाठवण्यात येत असल्याची माहिती आता समोर आली आहे. प्राप्तिकर विभागाकडून एखादा मेल आला की सर्व त्याकडे गांभीर्याने पाहतात. मात्र हॅकर्स याच गोष्टीचा फायदा घेतात. फेक मेलसोबत लोकांच्या सिस्टीमपर्यंत मालवेअर पोहोचवत आहेत. CERT-Inनं दिलेल्या माहितीनुसार, लोकांना फसवणूक करण्यासाठी ई-मेल्सच्या सबजेक्ट लाइनमध्ये इन्कम टॅक्सचा उल्लेख केलेला असतो. ‘Important: Income Tax Outstanding Statements A.Y 2017-2018’ किंवा ‘Income Tax statement’ अशा पद्धतीचा उल्लेख त्यामध्ये करण्यात आलेला असतो. प्राप्तिकर विभागाने असा कोणताही मेल पाठवलेला नाही. लोकांची वैयक्तिक माहिती चोरण्यासाठी अशा स्वरूपाचे मेल पाठवण्यात येतात.