चीनमधील आघाडीची इलेक्ट्रिक कार उत्पादक कंपनी असलेल्या BYD ला मोदी सरकारने मोठा झटका दिला आहे. या कंपनीने भारतात एक अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. हैदराबादमधील मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडसोबत भागीदारी करत भारतात प्लांट सुरू करण्याची या कंपनीची इच्छा होती. मात्र केंद्रातील मोदी सरकारने या चिनी इलेक्ट्रिक कार कंपनीचा प्रस्ताव फेटाळला आहे. तसेच सुरक्षिततेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारने म्हटले आहे.
माध्यमांतील वृत्तांनुसार, कंपनीच्या गुंतवणुकीच्या प्रस्तावाचे आकलन करण्यासाठी डीपीआयआयटीने विविध विभागांकडून इनपुट मागवले होते. चर्चेदरम्यान भारतात चिनी गुंतवणूकीशी संबंधित सुरक्षिततेच्या मुद्द्यावर चिंता व्यक्त करण्यात आली. बीवायडी संदर्भातही सरकारला अशीच चिंता असल्याचे आता समोर आले आहे. एवढेच नाही, तर चिनी कंपन्यांच्या प्रवेशासंदर्भात गृह आणि परराष्ट्र मंत्रालयही अस्वस्थ आहे. परदेशातील कंपन्यांना भारतात येण्यासाठी स्थानिक कंपन्यांसोबत करार करावा लागतो.
काही प्रकरणांमध्ये असेही दिसून आले आहे की, स्थानिक कंपन्या या डमी प्रमाणे असतात. बीवायडी प्रकरणातही सरकारला अशीच चिंता होती. यामुळेच केंद्र सरकारने या कंपनीचा प्लॅन फेटाळला.
असा होता कंपनीचा प्लॅन -
माध्यमांतील वृत्तांनुसार, आपण वर्षाला 10,000 ते 15,000 इलेक्ट्रिक कारचे उत्पादन करू, असा प्रस्ताव कंपनीने दिला होता. विक्रीच्या बाबतीत, BYD या जगातील आघाडीच्या इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनीने भारतात यापूर्वीच दोन EV मॉडेल सादर केले आहेत. याशिवाय ही कंपनी आपल्या इलेक्ट्रिक बसेससाठी MEIL ची सहकारी कंपनी असलेल्या ओलेक्ट्रा ग्रीनटेकला तांत्रिक सहकार्य देत आहे. ओलेक्ट्राला 2,000 बसेसची ऑर्डर मिळाली आहे. यचे मुल्य 3,000-3,500 कोटी रुपये एवढे आहे. ही ऑर्डर पुढील 12 ते 18 महिन्यात पूर्ण करण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे.