नवी दिल्ली- लोकसभा निवडणूक 2019पूर्वीच मोदी सरकार मोठी नोकरभरती करण्याची शक्यता आहे. मोदी सरकारमधल्या तीन मंत्रालयात मोठ्या प्रमाणात जागा भरण्यात येणार आहेत. या मंत्रालयांमध्ये मनुष्यबळ विकास मंत्रालय, श्रम मंत्रालय आणि कौशल्य विकास मंत्रालयांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या मंत्रालयांमध्ये पदवी नसलेल्या कर्मचाऱ्यांनाही सामावून घेतलं जाणार आहे.मोदी सरकार या तरुणांना प्रशिक्षणार्थी योजनेतून रोजगाराची संधी देणार असून, बेरोजगार तरुण आणि ज्यांनी तांत्रिक शिक्षण घेतलेले नाहीत, अशांना या नोकऱ्यांमध्ये प्राधान्यक्रम दिला जाणार आहे. तरुणांना सुरुवातीला 6 ते 10 महिने प्रशिक्षणार्थी म्हणून काम करावं लागणार आहे. त्यानंतर त्यांना या नोकरीत कायम करण्यात येणार आहे. मोदी सरकारच्या या निर्णयानं सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगार, स्वयंरोजगार व नोकरीचे दालन खुले होणार आहे. दरवर्षी लाखो नवीन नोक-या तयार होत असल्याचे बोलले जात आहे. तसे असले, तरी वास्तवात बेरोजगारी अधिक प्रमाणात वाढत आहे. देशातील नोक-या निर्मितीचा नेमका सर्वसमावेशक आकडा काढणे अशक्य आहे, पण स्थिर किंवा समाधानकारक नोकरीबाबत देशातील युवकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. देशात वाढत्या लोकसंख्येसोबतच बेरोजगारीमध्येही मोठी वाढ होत असल्याचे चित्रही गेल्या काही दिवसांपूर्वी समोर आले होते.यापूर्वी जवळपास 2.3 टक्क्यांवर सातत्य राखून असलेले बेरोजगारीचे प्रमाण 2015 मध्ये 5 टक्क्यांवर पोहोचले होते. त्यामध्ये बेरोजगार तरुणांची संख्या सर्वाधिक असून 16 टक्के तरुणाई जॉबलेस आहे. स्टेट ऑफ वर्किंग इंडिया (SWI) च्या अहवालानुसार, 2018 मध्ये देशातील बेरोजगारीचे प्रमाण गेल्या 20 वर्षांच्या कालवधीत सर्वात अधिक होते. विशेष म्हणजे या अहवालानुसार देशातील 82 टक्के महिलांना आणि 92 टक्के पुरुषांना 10 हजार रुपयांपेक्षाही कमी मासिक वेतन मिळत होते.
बेरोजगारांसाठी खूशखबर! मोदी सरकार करणार मोठी नोकरभरती
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2018 1:07 PM
लोकसभा निवडणूक 2019पूर्वीच मोदी सरकार मोठी नोकरीभरती करण्याची शक्यता आहे.
ठळक मुद्देलोकसभा निवडणूक 2019पूर्वीच मोदी सरकार मोठी नोकरीभरती करण्याची शक्यता आहे. मोदी सरकारमधल्या तीन मंत्रालयात मोठ्या प्रमाणात जागा भरण्यात येणार आहेत. या मंत्रालयांमध्ये मनुष्यबळ विकास मंत्रालय, श्रम मंत्रालय आणि कौशल्य विकास मंत्रालयांचा समावेश आहे.