नवी दिल्लीः गेल्या काही दिवसांपासून भारतीय अर्थव्यवस्थेवर मंदीचे ढग दाटून आले आहेत. अर्थव्यवस्थेच्या दिवसेंदिवस घसरत चाललेला स्तर आणि कंपन्यांना लागत असलेल्या टाळ्यावरून रघुराम राजन यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं. इंडिया टुडेमध्ये लिहिलेल्या राइट अपमधून रघुराम राजन यांनी मोदींना काही शहाजोग सल्ले दिले आहेत. भारतात मंदीची समस्या गंभीर असल्याचं सरकारनं मान्य करायला हवं. राज्य सरकारांना दोष देण्याऐवजी यातून केंद्रानं मार्ग काढायला हवा.तसेच सत्तेचं केंद्रीकरण आणि पंतप्रधान कार्यालयाकडून ठेवण्यात येत असलेल्या नियंत्रणावरही इशारा दिला आहे. राजकीय हेतूनं प्रेरित होऊन कोणत्याही समस्येचं बाऊ करण्याचा प्रयत्न करू नका. कोणतीही समस्या ही तात्पुरत्या स्वरूपाची असल्याचं म्हणणं आता सोडलं पाहिजे. पंतप्रधान कार्यालयात अधिकारांचं केंद्रीकरण झाल्यानंच इतर मंत्र्यांना काम करण्यात अडचणी येत आहेत. तसेच असंघटीत क्षेत्रांना सशक्त करून सरकार गुंतवणूक करणाऱ्या एजन्सींना प्रोत्साहन देऊ शकते. त्यांनी दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी व्यवसायावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. गेल्या काही दिवसांपूर्वीच जीडीपीचे नवे आकडे समोर आले आहेत. जीडीपीचा अंदाज 5.8 टक्क्यांचा होता, परंतु आता 4.5 टक्क्यांवर आलेला आहे. त्यामुळे सरकार विरोधकांच्याही रडारवर आहे. तसेच माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनीही सरकारला दिशाहीन सांगत त्यांच्यावर टीका केली होती.
भारतात मंदीची समस्या गंभीर, मोदींनी मान्य करायलाच हवी- रघुराम राजन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2019 4:31 PM