भारतीय क्रिकेट संघाने ८ व्यांदा आशिया चषक जिंकत जगभरात आपलं नाव केलंय. रविवारी श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात भारताने १० गडी राखून मोठा विजय मिळवला. भारताच्या या विजयाचा शिल्पकार ठरला तो, टीम इंडियाचा गोलंदाज मोहम्मद सिराज. सिराजने ६ गडी बाद करत श्रीलंकन खेळाडूंना घरचा रस्ता दाखवला. सिराजच्या या खेळीचं जगभरातून कौतुक होत असून दिग्गजांकडून त्याचं अभिनंदन करण्यात येत आहे. मास्टरब्लास्टर सचिननेही सिराजचं कौतुक केलंय.
आंतराष्ट्रीय पातळीवर दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचं मनोबल वाढविण्यासाठी आणि देशातील युवा खेळाडूंना प्रेरणा मिळावी म्हणून महिंद्रा ग्रुपचे प्रमुख आनंद महिंद्रा अशा कर्तबगार खेळाडूंना कार भेट देतात. त्यामुळे, अशा काही प्रसंगात चाहत्यांकडून महिंद्रांकडे कारची विचारणा केली जाते. सिराजच्या या कामगिरीचं जगभरातून कौतुक होत असल्याने सिराजलाही महिंद्रा यांनी एसयुव्ही कार गिफ्ट करावी, अशी मागणी एका चाहत्याने केली होती. त्यावर, आनंद महिंद्रा यांनी मजेशीर उत्तर दिलंय. त्यामुळे, या चाहत्याची बोलती बंद.. असंच काही म्हणता येईल.
Been there, done that… https://t.co/jBUsxlooZf
— anand mahindra (@anandmahindra) September 17, 2023
सिराजच्या चाहत्याने ट्विट करत महिंद्रा यांच्याकडे सिराजसाठी एसयुव्ही कारची मागणी केली होती. त्यावर, ऑलरेडी सिराजला कार देण्यात आलीय, असेही त्यांनी म्हटलं. दरम्यान, आनंद महिंद्रा यांनी भारताच्या आशिया चषकातील विजयाबद्दल संपूर्ण संघाचं अभिनंदन केलंय. त्यात, मोहम्मद सिराजचं खास कौतुक केलंय.
I don’t think I have EVER before felt my heart weep for our opponents….It’s as if we have unleashed a supernatural force upon them… @mdsirajofficial you are a Marvel Avenger… https://t.co/DqlWbnXbxq
— anand mahindra (@anandmahindra) September 17, 2023
आनंद महिंद्रा यांनी ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील भारतीय संघाच्या विजयावर खुष होऊन कारची घोषणा केली होती. ऑस्ट्रेलियाविरोधातील मालिकेत पदार्पण करणाऱ्या सहा खेळाडूंना महिंद्राची नवी SUV थार गिफ्ट करण्याचा निर्णय तेव्हा त्यांनी घेतला. त्यावेळी, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, टी नटराजन, वॉशिंग्टन सुंदर, शुभमन गिल आणि नवदीप सैनी या सहा खेळाडूंना आनंद महिंद्रांकडून एसयुव्ही थार ही कार भेट देण्यात आली आहे. त्यामुळे चाहत्याची मागणी याआधीच महिंद्रांकडून पूर्ण केलेली आहे.
दरम्यान, स्थानिक स्पर्धांमध्ये तो जेव्हा पहिला सामना खेळला तेव्हा त्यानं २० धावा देत ९ विकेट्स घेतल्या होत्या, त्यासाठी त्याला ५०० रुपये बक्षीस मिळाले होते. क्रिकेटनं दिलेला हा पहिला पुरस्कार होता. सिराजचे वडील रिक्षाचालक होते, परंतु त्यांनी मुलांच्या स्वप्नांत परिस्थिती कधीच आड आणली नाही. मुलांच्या स्वप्नांसाठी ते दिवसरात्र मेहनत करत राहिले. हलाखीच्या स्थितीत साधारण वस्तीत राहून मोहम्मद सिराज मोठा झाला. दुर्दैवाने सिराज ऑस्ट्रेलियन दौऱ्यावर असताना त्याच्या वडिलांचे कोरोनाकाळात निधन झाले.