मुंबई : गेल्यावर्षीच्या अस्थिरतेच्या आंबटगोड आठवणी मागे सारत लक्ष्मीपूजनाच्या (संवत २०७२) झालेल्या मुहुर्ताच्या व्यवहारांवर तेजीची मोहोर उमटली आहे. सायंकाळी पावणे सहा ते पावणे सात अशा एक तास झालेल्या मुहुर्ताच्या विशेष सत्रात सेन्सेक्सने १२३ अंशांची झेप घेतली तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक असलेल्या निफ्टीमध्येही ४१ अंशांची वाढ झाली. मुहुर्ताच्या व्यवहारांत तेजीचा प्रवेश झाल्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये अत्यंत चैतन्याचे वातावरण होते.
बिहार निवडणुकीत झटका खालेल्या मोदी सरकारने मंगळवारी सायंकाळी १५ क्षेत्रात थेट परकीय गुंतवणुकीच्या मर्यादेत आणि प्रक्रियेतील सुलभतेची घोषणा केली आणि अपेक्षेप्रमाणे त्याचे सकारात्मक पडसाद मुहुर्तांच्या व्यवहारावर उमटले. पावणेसहा वाजता शेअर बाजारात दलालांनी पारंपरिक चोपडा पूजन व लक्ष्मीपूजन करून व्यवहारांना सुरुवात केली. व्यवहारांना सुरूवात होताच, ज्या क्षेत्राची कवाडे परकीय गुंतवणुकीसाठी सरकारने खुली केली त्या क्षेत्रातील कंपन्यांना मोठी मागणी असल्याचे दिसून आले. परकीय वित्तीय संस्था, देशी वित्तीय संस्था त्यांच्यासोबत सामान्य गुंतवणूकदाराने सक्रिय होत जोमाने खरेदी केली.
मुहुर्तांच्या व्यवहाराचे वैशिष्ट्य म्हणजे, सेन्सेक्स श्रेणीतील कंपन्यांसोबतच मिड कॅप आणि स्मॉल कॅप श्रेणीती कंपन्यांना मोठी मागणी होती. प्रत्यक्ष सेन्सेक्स श्रेणीतील कंपन्यांच्या व्यवहारांचा विचार करता त्यामध्ये ०.४८ टक्क्यांनी वाढ झाली तर, त्यातुलनेत स्मॉल कॅपश्रेणीत १.४८ टक्के तर मिड कॅपमध्ये १.०५ टक्के वाढ झाली.
३० टक्के परतावा अपेक्षित
सरकारने १५ क्षेत्रातील परकीय गुंतवणुकीबाबत आक्रमक घोषणा केल्यानंतर आता एकूणच आर्थिक सुधारणांच्या पातळीवर सरकार सक्रिय असेल असे संकेत मिळत आहे. ज्या क्षेत्रातील परकीय गुंतवणुकीचे प्रमाण वाढविले आहे किंवा सुलभीकरण केले आहे, अशा क्षेत्रात आता आमूलाग्र बदल होताना दिसतील. या पार्श्वभूमीवर जर या क्षेत्रातील कंपन्यांचा अभ्यास करत त्यात गुंतवणूक केली तर आगामी दोन वर्षांत ३० टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल असे मत बाजार विश्लेषण सुनील देव यांनी दिली.
मुहूर्ताचा उत्साह... मुंबई शेअर बाजारात बुधवारी मुहूर्ताचे सौदे झाले. सलामीलाच बाजार तेजाळला. त्यामुळे व्यावसायिकांत असा आनंद व्यक्त झाला. बाजूच्या छायाचित्रात घंटानाद करून बाजार सुरू करताना चित्रपट अभिनेत्री ईशा कोप्पीकर आणि सीईओ आशिष चौहान. शेअर बाजाराच्या नव्या वर्षाकडून व्यावसायिकांना मोठ्या अपेक्षा आहेत. संवत २0७१ या वर्षात मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचे निर्देशांक घसरले आहेत. या पार्श्वभूमीवर नव्या वर्षाच्या मुहूर्ताच्या सौद्यातील तेजी महत्त्वाची असल्याचे मानले जात आहे.
मुहूर्ताच्या व्यवहारांवर तेजीची मोहोर...!
सेन्सेक्सने १२३ अंशांची झेप घेतली तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक असलेल्या निफ्टीमध्येही ४१ अंशांची वाढ झाली.
By admin | Published: November 11, 2015 11:28 PM2015-11-11T23:28:00+5:302015-11-11T23:28:00+5:30